बिरसी-फाटा : तिरोडा तालुक्यातील ग्राम घाटकुरोडाला मागील १९ वर्षांपासून शेतीसाठी पाणी मिळत नसल्याच्या प्रकरणाला घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत संबंधित विभागाने आता गावाला शेतीसाठी पाणी देण्याची कबुली दिली.
तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा हे गाव वैनगंगा नदी काठावरती असून रेतीघाटाकरिता प्रसिद्ध आहे. शासनाला महसूल मिळण्यासाठी या गावाचा सिंहाचा वाटा आहे व येथील रेतीघाट गोंदिया जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. घाटकुरोडा गावाला शेतीला पाणी देण्यासाठी कालव्याचे साधन आहे. मात्र, १९ वर्षांपासून त्या कालव्याला उन्हाळी व पावसाळी या दोन्ही पिकांकरिता कधीही पाणी मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार होती. जनप्रतिनिधींनीही शेतकऱ्यांच्या समस्यांकडे कधीही लक्ष दिले नाही. अशात प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख प्रदीप निशाणे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल घेत धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प टप्पा क्रमांक-१ मध्ये घाटकुरोडा गाव येत असूनही त्यांना शेतीसाठी पाणी न मिळाल्याने कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले होते. तसेच त्याची दखल न घेतल्यामुळे २ जुलैपासून आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता. यावर तहसीलदारांनी संबंधित अधिकारी व प्रहार कार्यकर्त्यांना आपल्या कार्यालयात पाचारण करून चर्चा केली. त्यात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदारांसमोर घाटकुरोडा गावाला पाणी देण्याची कबुली दिली. मागणी मंजूर झाल्याने प्रहारच्या वतीने करण्यात येणारे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. तहसील कार्यालयात चर्चेला तालुकाध्यक्ष निशाणे, जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, जिल्हा सचिव महेंद्र नंदागवळी, तालुका सचिव रवी फुलझेले, कार्यकर्ता तिलक पारधी, धापेवाडा प्रकल्पाचे गेडाम व शेतकरी उपस्थित होते.