रस्ताही उखडला : जराशा पावसानेही पुलावरून वाहते पाणी काचेवानी : तिरोडा तालुक्याच्या जि.प. कवलेवाडा क्षेत्रांतर्गत घोगरा-घाटकुरोडा पूल व रस्ता अत्यंत जर्जर झाले आहेत. पावसाळ्याच्या थोड्याशा पाण्यानेही पाणी पुलावरून वाहते. त्यामुळे या पुलावर केव्हाही दुर्घटना घडू शकते. मागील आठवड्यात सतत आलेल्या पावसामुळे पुलावरून पाणी वाहात असल्याने रस्ता उखडला व पुलाची स्थितीसुद्धा कमकुवत होत चालली. पुलावरून पाणी वाहात असल्याने घोगरा व घाटकुरोडा या दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. अशावेळी दोन्ही गावांच्या नागरिकांना मोठाच त्रास होत असल्याचे जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी सांगितले आहे. जि.प. सदस्य डोंगरे यांनी ग्रामस्थांसह रस्ता व पुलाची पाहणी केली. पुलाच्या बाजूचे नाल्याचे काठसुद्धा वाहून गेले असून कधीही दुर्घटना घडू शकते, असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील हे रस्ते आणि रस्त्यावरील पूल कमी वजनाचे वाहन चालतील या उद्देशाने तयार करण्यात आले आहेत. परंतु काही दिवसांपासून घाटकुरोडा रेतीघाटावरून रेतीचा उपसा केला जात आहे. जड वाहनांची ये-जा असल्याने रस्त्याची कालमर्यादा टिकून राहिली नाही. तसेच ग्रामीण भागातील रहदारीच्या दृष्टिने रस्ते व पूल तयार करण्यात आले. परंतु अवजड वाहनांच्या रहदारीमुळे पूल कधीही दुर्घटनाग्रस्त होवू शकतात, अशी शंका मनोज डोंगरे यांनी व्यक्त केली आहे. रस्ते व पुलाची पाहणी करताना जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांच्यासह सरपंच गीता देव्हारे, पोलीस पाटील भांडारकर, किरण वैद्य, अरूण खळोदे, माजी सरपंच नत्थू बिसेन व मुंडीकोटा येथील तलाठी तसेच गावकरी उपस्थित होते. (वार्ताहर) रेतीचे वाहन अडविणार भार क्षमता सहन करणारे रस्ते तयार करा, नंतरच या रस्त्यांवरून रेतीची जड वाहने चालविण्यात यावे. यासाठी पाऊस संपताच कोणतेही रेती वाहून नेणारे वाहन रस्त्यावरून जावू देणार नाही, असा इशारा जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाला दिला आहे. रेती घाटांमुळे लाखो रूपयांचा महसूल राजस्व विभागाला मिळतो. त्यातून रस्ते व पुलाची दुरूस्ती करायला हवे, असेही डोंगरे म्हणाले.
घोगरा-घाटकुरोडा पूल जीर्ण
By admin | Published: August 12, 2016 1:31 AM