मुंडीकोटा : जवळील घोगरा गावाला अनेक समस्यांनी विळखा घातला असून, येथील समस्या सोडविण्याकडे शासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष दिसून येत आहे.
घोगरा व पाटीलटोला ही दोन्ही गावे मिळून घोगरा येथे गट ग्रामपंचायत आहे. घोगरा येथे आरोग्य उपकेंद्र असून, सज्ज इमारत आहे. या आरोग्य उपकेंद्रात घोगरा, पाटीलटोला, घाटकुरोडा, चांदोरी व बिरोली या गावांचा समावेश आहे. उपकेंद्रात ३ महिला कर्मचारी कार्यरत आहेत, पण रात्रीच्या वेळी कुणीच हजर राहत नसून, अशात एखाद्या व्यक्तीची प्रकृती बिघडल्यास, त्यांना तिरोडा अथवा तुमसर येथे हलवावे लागते. यामुळे हे उपकेंद्र शोभेचे ठरत आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून ही इमारत तयार केली. मग ती इमारत कशासाठी, असा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा आहे.
घोगरा व पाटीलटोलात शासनाने प्रादेशिक नळयोजना बऱ्याच वर्षांपासून तयार केली आहे. या नळयोजनेचे पाणी घोगरा व पाटीलटोला या दोन्ही गावांना सकाळीच पुरविले जाते, पण या नळयोजनेचे पाणी घोगरात अर्ध्या गावालाच मिळत असून अर्धे गाव पाण्याविना कोरडेच असते. घोगरातील काही घरांपर्यंत पाणी पोहोचू शकत नाही. त्यामुळे अशांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. अनेकदा ग्रामपंचायतला लेखी निवेदन देण्यात आले, पण याकडे सरपंच व सचिवांनी दुर्लक्ष केले आहे.
--------------------
गावातील विहिरींवर काहींचे अतिक्रमण
गावात ग्रामपंचायतच्या अनेक विहिरी असून, त्यावर गावातील काही व्यक्तींनी आपल्या मनमर्जीने वीज पंप लावले आहेत, अशा व्यक्तीवर कोणत्याच प्रकारची कारवाई ग्रामपंचायतने केली नाही. ही बाब सरपंच व सचिवांना माहिती असूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे, तरी संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी गावकरी करीत आहेत.