साखरीटोला : अलीकडच्या विज्ञान युगात महिलांनी विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली असून प्रत्येक क्षेत्र काबीज केले आहे. आता महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने कार्य करून आपण कुठेच मागे नाही हे दाखवून दिले आहे. असे असले तरी आजही महिलांवरील अन्याय व अत्याचार वाढतच आहेत. अनेकदा मुलींवर अतिशय वाईट प्रसंग उद्भवतात अशावेळी महिलांनी सक्षम बनणे व स्वत:चे रक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी मुलींनी स्वसंरक्षणाकरिता आत्मसंरक्षण करणाऱ्या कराटेचे धडे घ्यावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी सभापती लता दोनोडे यांनी केले.
न्यू चॅम्पियन कराटे क्लबच्यावतीने रविवारी (दि.१४) येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या पटांगणात आयोजित बेल्ट ग्रेडेशन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. उद्घाटन काँग्रेस कमिटीच्या जिल्हा प्रतिनिधी वंदना काळे तर मंचपूजन भाजपाच्या टीना चुटे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय देशमुख, आयोजक डाॅ. अजय उमाटे, प्रा. सागर काटेखाये, उपसरपंच अफरोज पठाण, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव राजू काळे, ग्रा.पं. सदस्य श्वेता अग्रवाल, डॉ. अनिस अग्रवाल, जयश्याम फाफनवाडे, ग्रॅन्डमास्टर राजन पिल्ले, ग्रॅन्डमास्टर सुनील शेंडे, सेन्साई संजय नागपुरे, जी.डी. भांडारकर, कराटे मार्गदर्शक नीलकंठ दोनोडे, अनिल डोये, ममता गायधने उपस्थित होते.
सर्वप्रथम शक्तीचे दैवत बजरंग बली व ब्रुसली यांच्या छायाचित्राला पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी कराटे स्पर्धकांनी आपल्या कला प्रदर्शित करण्यासाठी डेमो करून दाखविले. तसेच विद्यार्थ्यांना विविध बेल्टचे वितरण करण्यात आले. पाहुण्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. मुला-मुलींनी विविध क्रीडा क्षेत्रसुध्दा उपयोगाचे आहे, असे मत वंदना काळे यांनी व्यक्त केले. संचालन रजत दोनोडे व संजय नागपुरे यांनी केले.