गोंदिया : विदर्भातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील बीएड अभ्यासक्रमातील चौथ्या म्हणजेच शेवटच्या सेमिस्टरला असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागातर्फे घेण्यात येत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टाईटी परीक्षेला बसण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे भावी शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा नुकसान सहन करावे लागत आहे. अशात त्यांना परीक्षेला बसण्याची संधी द्या अशी मागणी विदर्भ स्टुडंट युथ ऑर्गनायझेशनने केली आहे.
कोरोनामुळे आधीच नुकसान झाले आहे. त्यातच महत्वाच्या असलेल्या परीक्षेला न बसू देता सरकार जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती होणार असून त्यासाठी टीईटी परीक्षा हीच गुणवत्ता असणार आहे. अनेक विद्यार्थी कित्येक वर्षांपासून टीईटी परीक्षेची वाट पाहत असून त्याची तयारी सुरू आहे. परीक्षेसाठी ३ ऑगस्टपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहे. त्यात बीएड अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाच अर्ज करता येत असून कोरोनामुळे लांबलेल्या शेवटच्या सेमिस्टरला असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार नाही. त्यामुळे कोरोना काळात लांबलेल्या सत्राचा फटका विनाकारण विद्यार्थ्यांना बसणार आहे. कोरोना नसता तर आतापर्यंत बीएड अभ्यासक्रम पूर्ण झाले असते व ते हजारो विद्यार्थी टीईटी परिक्षेला पात्र असते. त्यामुळे विदर्भातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून या अन्यायाबद्दल शालेय शिक्षण विभागावर रोष आहे.
.........
शिक्षण मंत्र्यांना पाठविले निवेदन
नेट सेट, नीट सारख्या पात्रता किंवा एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षेत सुद्धा शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी असताना विद्यार्थ्यांना त्रास देण्याचे काम शालेय शिक्षण विभाग करीत आहे. त्यामुळे विदर्भ स्टुडंट अँड युथ असोसिएशनतर्फे नागपूर, भंडारा, गोंदिया व वर्धा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शालेय शिक्षण मंत्र्यांना निवेदन पाठवून शेवटच्या सेमिस्टरला असलेल्या बीएड च्या विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षेत बसण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
..........
निषेध व आंदोलनाचा इशारा
अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट असल्याने विदर्भातील विद्यार्थ्यांचे नुकसान न करता शेवटच्या सत्राला असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करू द्यावे. संकेतस्थळावर लवकरात लवकर तशा सूचना द्याव्या व बदल करावे अशी मागणी संघटनेने केली आहे. अन्यथा विदर्भातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असताना शांत न बसता विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यात निषेध व आंदोलन करण्यात येईल असा इशारा विदर्भ स्टुडंट अँड युथ असोसिएशनचे संयोजक अनिकेत मते यांनी दिला आहे.