टेंभरे यांची मागणी : रेल्वेचे टॉवरलाईन प्रकरण गोंदिया : रेल्वे विभागाच्यावतीने मुंडीपार ते हिरडामालीदरम्यान टॉवर लाईनकरिता विद्युत टॉवर उभारणे सुरू असून या प्रकरणी शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना अथवा कोणताही जमीनीचा मोबदला न देता टॉवर उभारणे सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत असल्याने रेल्वे विभागाने शेतकऱ्यांना जमीनीचा योग्य तो मोबदला द्यावा, अशी मागणी रेल्वे अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान संजय टेंभरे यांनी केली. दरम्यान रेल्वे विभागाने सकारात्मक पावले न उचलल्यास आंदोलनात्मक पवित्राचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. रेल्वे विभागाच्यावतीने गोंदिया-चंद्रपूर रेल्वे लाईनकरिता विद्युत पुरवठा करण्यासाठी हिरडामाली येथे विद्युत साठवण केंद्र क्रियान्वित करण्यात आले असून यासाठी गोंदियाच्या एमआयडीसी क्षेत्रातील मुंडीपार येथून विद्युत पुरवठा केला जाणार आहे. यासाठी रेल्वे विभागाने मुंडीपार ते हिरडामालीदरम्यान तुजलाराम राजाराम दिहारी चुटिया, भाऊराम सखाराम फाये, बुधा मयाराम भगत, शामलाल गोधन बघेले सर्व लोधीटोला, प्रल्हाद चैतराम हरीणखेडे गणखैरा, ओंकार ब्रिजलाल पारधी पुरगाव, गजानन रहांगडाले, राजकुमार रहांगडाले, चंदन पंधरे, रेखा ठाकरे, मनिराम कटरे, नान्हू बागडे सर्व (रा. चिचगाव) तसेच डिगेंद्र रहांगडाले पुरगाव या शेतकऱ्यांच्या शेतात टॉवर लाईनकरिता विद्युत टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे.टॉवरचे बांधकाम करताना एक दोन शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई म्हणून १५ हजार रुपये देण्यात आले. तरी अनेक शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळालेला नाही. त्याचप्रमाणे टॉवरचे बांधकाम होत असताना वडिलोपार्जीत जमीन निरूपयोगी होत असल्याने बाजारभावानुसार शेतमिनीचा मोबदला देण्यात यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. यासंदर्भात चुटिया व लोधीटोला परिसरातील शेतकऱ्यांनी या विद्युत टॉवरच्या बांधकामाला विरोध दर्शवून बांधकाम थांबविले आहे. दरम्यान टेंभरे यांच्या नेतृत्वात रतन बघेले, उत्तम भगत यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी नागपूर येथील रेल्वे विभागाच्या कार्यालयात डीईई दीनानाथ व डीसी ठाकूर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. मात्र रेल्वे विभागाच्यावतीने फक्त पीक नुकसान भरपाई देण्यात येणार, इतर कोणतीही मदत देता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र टेंभरे यांनी शेतकऱ्यांना जोपर्यंत त्यांचा जमिनीचा मोबदला बाजारभावानुसार देणार नाही तोपर्यंत टॉवरचे बांधकाम सुरू होवू देणार नसल्याचे सांगून आंदोलनात्मक पवित्रा घेवून शेतकऱ्यांना न्याय देणार असल्याचे सांगितले. (शहर प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला द्या
By admin | Published: May 06, 2016 1:33 AM