दिलीप बन्सोड : अनेक शेतजमिनी रोवणीपासून वंचित; हेक्टरी २५ हजारांची मागणीगोंदिया/काचेवानी : तिरोडा तालुक्यातील अनेक गावांत पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्या गावांतील अनेकांची शेती रोवणीपासून वंचितच राहिली. त्यामुळे अशा रोवणी न झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने २५ हजार रूपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी केली आहे. शेतकरी व बेरोजगार यांना काम, घरकूल व गॅस कनेक्शनचा गरजूंना लाभ द्यावे, निराधार, वृद्धापकाळ व भूमिहिन शेतमजुरांना निर्धारित तारखेला सहाय्य राशी (पेंशन) देणे आणि धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, या आशयाचे निवेदन तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी यांना देण्यात आले आहे.तिरोडा तालुक्यात नवेझरी, सितेपार, खेडेपार, कोयलारी, कोडेलोहारा, केसलवाडा, येडमाकोट, नवेगाव, लेदडा, कुल्पा, नांदलपार, सिल्ली, माल्ही व सोनेखारी या १४ व इतर काही गावांत पावसाच्या अभावाने रोवणी होवू शकली नाही. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट पसरले आहे. शासनाने या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपये मदत देवून रबीकरिता मोफत बियाण्यांची सोय करावी, अशी मागणी माजी आ. दिलीप बन्सोड यांनी केली आहे.शासकीय आधारभूत किमतीवर धान खरेदी केंद्रांची सुरूवात तात्काळ करण्यात यावी. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फ्रीसेल खरेदी सुरू करण्यात यावी. निराधार, श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विधवा, अपंग, निवृत्ती योजना यासारख्या योजनांच्या आवेदनांवर तलाठी स्वाक्षरी करीत नाहीत. त्यावर स्वाक्षरी करण्याचे आदेश देण्यात यावे. दिरंगाई व टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी आ. बंसोड यांनी केली आहे.सद्यस्थितीत ग्रामपंचायतींमध्ये घरकुलांच्या बोगस याद्या पाठविण्यात आल्या आहेत. प्रत्येक गावात सदर याद्यांवरून नागरिकांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये तांडव निर्माण झाले असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या याद्या निरस्त करून ग्रामसभेद्वारे गरजू लोकांना घरकुलांचा लाभ प्राधान्याने मिळावा, यासाठी नवीन याद्या तयार करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना देण्यात यावे. गॅस कनेक्शनच्या याद्यासुद्धा रद्द करून शासकीय नियमांनुसार लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी. धापेवाडा उपसा सिंचनाची लोडशेडिंग बंद करून शेतकऱ्यांना पाणी पुरवावे. वीज खंडित होवू नये यासाठी निधी उपलब्ध असावी, अशी व्यवस्था प्रकल्प अधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी बंसोड यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या
By admin | Published: October 06, 2016 1:00 AM