गोंदिया : सध्या कोरोना व म्युकरमायकोसिस रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशातच नुकतेच अंतिम वर्षीय उत्तीर्ण झालेले विध्यार्थी रुग्णालयातील विविध वाॅर्ड, विभाग, प्रयोगशाळा इ. ठिकाणी रुजू झाले आहेत व जीवाची पर्वा न करता आरोग्याला असलेल्या धोका पत्कारून आपले कर्तव्य बजावत आहेत. करिता त्यांना वाढीव विद्यावेतन देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
कोरोनाने पुन्हा एकदा पाय पसरले असल्याने अंतिम वर्ष उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मदत रूग्णांच्या उपाचारासाठी घेतली जात आहे. अशात ते आपल्या जीवाची पर्वा न करता रूग्णालयातील विविध विभागांत रूजू झाले असून आपली सेवा देत आहेत. हे करताना त्यांच्या
आरोग्यास असलेला धोका लक्षात घेवून त्यांना शासनाकडून आरोग्य विमा सुरक्षा कवच मंजूर करावे तसेच वाढीव विद्यावेतन प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा अशी मागणी आंतरवासिता डॉक्टरांनी केली. यासाठी त्यांनी बुधवारी (दि.२६) गोंदियात आलेले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, खासदार सुनील मेंढे व आमदार परिणय फुके यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी केली. यावर त्यांनी याविषयावर आपण स्वतः वैयक्तिक लक्ष घालू आणि ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देऊ असे आश्वासन दिले. याप्रसंगी आंतरवासिता डॉक्टर डॉ. सूर्यकांत अशोकराव चौधरी, डॉ. फैसल सादिक शेख व अन्य उपस्थित होते.