गोंदिया : तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथील जागृती सहकारी पतपुरवठा संस्था मर्यादितच्या संचालक मंडळ व कर्मचारी यांनी संगनमताने केलेल्या आर्थिक गैरव्यवहारामुळे सहा हजार खातेदारांचे ४२ कोटी रुपये बुडाले आहेत. याप्रकरणात दोषींना अटक करुन पीडित खातेदारांना न्याय द्यावा, अशी मागणी पीडित खातेदारांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे केली.
खासदार प्रफुल्ल पटेल शनिवारी एका भेटी संदर्भात तिरोडा तालुक्यातील सिल्ली येथे आले होते. यादरम्यान पीडित खातेदारांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावर खासदार पटेल यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा करुन योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश देऊन पीडित खातेदारांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. जागृती पतसंस्थेविरुद्ध खातेदारांनी केलेल्या तक्रारीमुळे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गोंदिया यांनी चौकशी व २०१५-१९ या आर्थिक वर्षाचे फेरलेखापरीक्षणाचे आदेश दिले. लेखाधिकारी सहकारी संस्था गोंदिया वर्ग-१ यांनी केलेल्या फेरपरीक्षणात ३ कोटी ३० लाख ७१ हजार रुपयांची अफरातफर व १५ कोटी ३२ लाख ४४ हजार ९१ रुपयांचा ठपका ठेवला. तसेच १६ आजी-माजी संचालक व १२ कर्मचाऱ्यांविरुद्ध ३० डिसेंबर २०२०ला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तिरोडा पोलिसांनी सर्व २८ आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४०९, ३४ व ४२० तसेच महाराष्ट्र गुंतवणूकदार संरक्षण कायदा सहकलम ३ व ४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. वास्तविक ५० लाख रुपयांच्या वर रक्कम असलेला आर्थिक गुन्ह्याचा तपास जिल्हा आर्थिक गुन्हा शाखा करते. परंतु या प्रकरणात हा गुन्हा आर्थिक शाखेकडे अद्याप वर्ग केला नाही. तिरोडा पोलीस ठाण्यातील अपुऱ्या मनुष्य बळामुळे तपासकार्य संथगतीने सुरू आहे. त्यामुळे खातेधारांमध्ये रोष व्याप्त आहे. शिष्टमंडळात पीडित खातेदार भास्कर गायकवाड, अशोक पेलागडे, संदीप खणंग, रितेश गहेरवार, एन. जी. मेश्राम, अरुणकुमार कडव, किशोर धार्मिक समावेश होता.
.....
६० दिवसांत केवळ पाच आरोपींना अटक
मागील ६० दिवसांत केवळ पाच आरोपींना अटक करण्यात आली. यात संस्थाध्यक्ष भाऊराव नागमोती, संचालक भोगेलाल बोहने, लीलाधर बांते, नंदा सेलोकर व कर्मचारी निखील मेश्राम यांना अटक झाली आहे. १ तज्ज्ञ संचालक व इतर दोन संचालक अंतरिम जामिनावर बाहेर आहेत, इतर २१ आरोपी अद्याप फरार आहेत. या आरोपींपैकी एकही आरोपी सराईत वा अट्टल गुन्हेगार नसून सर्व पांढरपेशा मध्यमवर्गीय व्यावसायिक आहेत. ते पोलिसांना सापडू नयेत हे आश्चर्य असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
.......
प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करा
१६ संचालक व १२ कर्मचारी यांनी संगनमताने हा गुन्हा केला असून, सहा हजार सामान्य खातेदारांचे जवळपास ४२ कोटी रुपये बुडविले आहेत. त्यांच्यावर इतर कलमांसोबत भादंवि १२० कलम सुद्धा लावण्यात यावी.
अपुरे मनुष्यबळ उपलब्ध असल्याने तिरोडा पोलीस या प्रकरणाचा तपास अत्यंत संथगतीने करीत आहे. ६० दिवसांनंतरही आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. त्यामुळे हे प्रकरण जिल्हा आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात यावे.
.........
तपासाच्या गाडीला का लागतोय ब्रेक
मुंडीकोटा येथील जागृती पतसंस्थेतील कोट्यवधी रुपयांचा घोळ पुढे येऊन आता दोन महिन्यांचा कालावधी लोटला मात्र अद्यापही याप्रकरणातील संपूर्ण आरोपींना अटक करण्यात आली नाही. तर तपासदेखील अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासाच्या गाडीला नेमका ब्रेक कोण लावतोय हा प्रश्नदेखील कायम आहे.