लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कचारगड तीर्थक्षेत्र आदिवासी व समस्त गोंडी समाज बांधवाचे श्रध्दास्थान आहे. दरवर्षी कोया पुनेम यात्रेदरम्यान आठ लाखाहून अधिक भाविक येथे भेट देतात. या स्थळाशी समस्त गोंडी समाजबांधवाच्या भावना जुळल्या असून या स्थळाचे आणि त्यांचे संस्कृतीचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. कचारगडला अ दर्जाच्या पर्यटन आणि तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन या स्थळाचा सर्वांगिन विकास करण्यात येईल. अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे कोया पुनेम महोत्सव व राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. महाअधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरीश आत्राम, पालकमंत्री राजकुमार बडोले, खा. अशोक नेते, आ.संजय पुराम, विजय रहांगडाले, डॉ.परिणय फुके, देवराव होळी, अशोक उईके, माजी आ.हेमंत पटले, खुशाल बोपचे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल व समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कचारगड या तीर्थक्षेत्राकडे आजवर दुर्लक्ष करण्यात आले, त्यामुळे या परिसराचा विकास खुंटला. मात्र आदिवासी आणि गोंडी संस्कृती फार जूनी असून या संस्कृतीचे जतन करणे आपली जबाबदारी आहे. या संस्कृतीला साडेतीनशे वर्षांचा इतिहास आहे. या समाजाने जल, जमीन, जंगल वाचविले म्हणून आज आपण श्वास घेवू शकत आहोत. गोंडराजे देखील पुरोगामी आणि पुढारेले होते. त्यामुळे त्यांनी स्थापन व निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीचे संवर्धन आणि संरक्षण करणे गरजेचे आहे. कचारगड हे आदिवासी आणि गोंडसमाजाचे श्रध्दास्थान व त्यांच्या संस्कृतीची ओळख करुन देणारे स्थान आहे. त्यामुळे या स्थळाचा सर्वांगिन विकास करुन त्याचे निश्चितच जतन केले जाईल. कचारगडला अ दर्जाचे तीर्थ व पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन विकास करण्यात येईल. यासाठी समिती व स्थानिक आमदारांनी विकासात्मक आराखडा तयार करुन तो सादर करावा. याकरिता जेवढा निधी लागेल तेवढा निधी देण्यात येईल. या परिसराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. आदिवासी समाजबांधवांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले. आ. संजय पुराम यांनी कचारगड व परिसरातील समस्या मुख्यमंत्र्यासमोर मांडून त्यासाठी निधी उपलब्ध करुन देऊन त्या मार्गी लावण्याची मागणी केली.गोंडी भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळवून देणार - नितीन गडकरीकेंद्र व राज्य शासनातर्फे आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. शोषीत, पिडीत आणि मागासलेला समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगिन विकास साधने हेच भाजपाचे मुख्य ध्येय आहे. गोंडी भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. यासाठी संविधानाच्या अनुसूचित ८ मध्ये समावेश करण्याची गरज आहे. ही मागणी लवकरच दिल्लीत चर्चा करुन मार्गी लावण्यात येईल. गोंडी भाषेला निश्चितपणे राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
३२ वर्षांनंतर प्रथमच भेट देणारे मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्रीसालेकसा तालुक्यातील कचारगड येथे दरवर्षी कोया पुनेम महोत्सवानिमित्त मोठी यात्रा भरते. या यात्रेला देशातील १६ राज्यातील आदिवासी व गोंडी समाजबांधव भेट देतात. मागील ३२ वर्षांच्या इतिहात येथे एकाही मुख्यमंत्री अथवा केंद्रीय मंत्र्याने भेट दिली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे येथे भेट देणारे मागील ३२ वर्षांतील पहिले मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असल्याचे सांगत देवस्थान समितीने त्यांचा गौरव केला.