लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : अतिक्रमण करणाऱ्यांना मालकी हक्काचे पट्टे द्या, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन तालुका कॉसीलच्यावतीने वरिष्ठ संघटनेच्या राज्यव्यापी आवाहनाअंतर्गत शुक्रवारी (दि.२०) तहसील कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष शेखर कनौजिया यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच मागण्यांचे निवेदन तहसीलदार अनिप पवार यांना देण्यात आले. धरणे आंदोलनातून, वनाधिकार कायदा २००६ ते २००८ अंतर्गत अतिक्रमण जमिनीचे प्रलंबित प्रकरण तत्काळ निकाली काढा आणि ग्रामीण आदिवासी व इतर पारंपरिक वन निवासी यांना ज्यांनी अतिक्रमण केलेले आहे, तसेच राजस्व आणि गायरान जमिनीवर ज्यांनी अतिक्रमण केले आहे, त्यांना तत्काळ मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे. कार्यालयात लंबित पडलेले सर्व प्रकरण जिल्ह्यात मंजुरीसाठी पाठवा आणि त्यांचा निर्णय अथवा अपिलीय प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यास अपात्र ठरविण्यात आल्याशिवाय दावेदारास त्यांच्या कब्जापासून त्यास बेदखल करण्यात येऊ नये, याची दक्षता घेण्यात यावी. वन जमिनीवर आणि राजस्व गायरान जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांचे प्रकरण घेण्यास नकार न करता ते घेण्यात यावे, देवरी आणि सालई-शांतीनगर (शेंडेपार ग्रा.पं.अंतर्गत) येथे प्लाॅटवर घरे बांधून ३० ते ४० वर्षांपासून राहत आहे, त्यांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे. रोजगार हमीचे काम सुरू करून एकाच कुटुंबातील २ व्यक्तींना १००-१०० दिवस काम व ६०० रुपये मजुरी द्यावी, काही रोजगार हमीच्या कामात १६० ते १९० रुपयापर्यंत फारच कमी मजुरी देण्यात येत आहे, तर बोरगाव तळ्याच्या कामात ५ महिने झाले त्यांना मजुरी देण्यात आली नाही. विशेष म्हणजे, रोजगार सेवक प्रत्येक आठवड्यात सालई आणि सेडेपार येथे २० रुपये मजुरांशी वसुली करतात, ती बंद करून त्यांच्यावर योग्य कार्यवाही करण्यात यावी. वृद्धापकाळ, श्रावणबाळ, इंदिरागांधी, संजय गांधी य सर्व निराधारांना प्रत्येक महिन्यात मानधन व वाढत्या महागाईला पाहता पाच हजार रुपये मानधन द्यावे, पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत ५ महिन्यांपासून बांधकामाची किस्त अद्यापही देण्यात आली नाही, ती तत्काळ त्यांना देण्यात यावी. शेतमजुरांना प्रत्येक कार्डवर ५० किलो धान्य वितरित करण्यात यावे, शेतजमिनीचा फेरफार होण्यास १ वर्षाहून ही जास्त दिवस लागतात, ते जलदतीने करण्यात यावे, आदी मागण्या मांडण्यात आल्या. या धरणा प्रदर्शनात बाबूराव राऊत यांच्या अध्यक्षतेत जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला शेखर कनौजिया यांनी संबोधित केले. या धरणा आंदोलनात शंकर बिंझलेकर, किसन ठाकरे, शामराव पंधराम, बबन राऊत, रामकृष्ण मुरापे, दसाराम शहारे, मंगरुजी मडावी, पुष्पा कोसरे, अनिता ढोमणे, प्रमिला गावळे, अंजना कोराम, आनंद मरकाम, गुलाब नेताम, बाबुलाल नेवारे, राधेश्याम इळपाते, सुभाष वाढीवे, जमू नाईक, मंसाराम शहारे आदी सहभागी झाले होते.