केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी या गावची नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील, दुर्गम आदिवासीबहूल भाग म्हणून शासन दप्तरी नोंद आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अशा भागातील आरोग्य सेवेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आरोग्य सेवा बळकट करण्याच्या दृष्टीने कटिबद्ध असून आरोग्याच्या विविध योजना कार्यान्वित करीत आहे. परंतु येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव शासन दरबारी धूळखात पडून आहे. या प्रस्तावाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या उपस्थितीत युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश पाटील नाकाडे यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांना निवेदन देऊन केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी केली आहे.
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर ३४ गावांतील नागरिकांच्या आरोग्याचा डोलारा असून मार्च २०२० पासून आलेल्या कोरोना महामारीचा सामना करीत दररोज २०० बाह्य रुग्णांची आरोग्य तपासणी नियमित करून सेवाअर्जित करताना कार्यरत कर्मचाऱ्यांना कमालीचा ताण निर्माण होत असते.
ग्रामीण रुग्णालय मंजुरी करीता आवश्यक असलेल्या परिसर, लोकसंख्या व भौगोलिक परिस्थती निकषांची पूर्तता करीत असून सुसज्ज इमारत आहे. या भागातील दिवसेंदिवस वाढणाऱ्या गंभीर आजाराच्या रुग्णांना १०० किमी. वर असलेल्या गोंदिया-भंडारा या ठिकाणी आरोग्य सेवेसाठी पाठवावे लागत असल्यामुळे गरीब रुग्णांच्या कुटुंबीयांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. या सर्व बाबींचा विचार करून तत्कालीन पालकमंत्री अनिल देशमुख यांनाही निवेदन देऊन ग्रामीण रुग्णालयाची मागणी करण्यात आली होती. परंतु प्रस्ताव शासन दरबारी धूळखात प्रलंबित ठेवण्यात आला आहे.
राज्यातील महाआघाडीचे सरकार आरोग्य व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आरोग्याच्या विविध योजना कार्यान्वित करीत असल्याची ख्याती असल्यामुळे आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार आणि खासदार पटेल यांनी राज्य शासनाकडे केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाची मंजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, यासाठी आ. चंद्रिकापूरे यांच्या उपस्थितीत युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नाकाडे यांनी खा. पटेल यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.