देवरी : शासनाद्वारे तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना आमगाव येथील ननसरी घाटातून रेती उपलब्ध करुन दिली असली तरी वाहतुकीचा खर्च जास्त येत असल्याने ती रेती परवडत नसल्याने घरकुल लाभार्थ्यांनी शिलापूर घाटावरुन रेती उपलब्ध करुन देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
घरकुल लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून घरकुलाची उर्वरीत रक्कम मिळत नसल्याने घरकुल लाभार्थी त्रस्त आहेत. तालुक्यात रेती मिळत नसल्याने हजारो लोकांची घरकुलची कामे रखडली आहेत. अशातच जिल्हा प्रशासनाने देवरी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना आमगाव तालुक्यातील ननसरी घाटावरुन रेती उपलब्ध करुन दिली असली तरी देवरीकडून आमगावचे ट्रॅक्टर भाडे ३५०० रुपये लागत असल्याने ही रेती घरकुल लाभार्थ्यांना न परवडणारी आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना देवरी तालुक्यातील लाभार्थ्यांना शिलापूर घाटातूनच रेती उपलब्ध करुन देण्याची मागणी घरकुल लाभार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. शिलापूर घाटात मुबलक प्रमाणात रेती उपलब्ध आहे. त्यामुळे ती घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.