गोंदिया : शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर रबी हंगामातील धान विक्री करण्यासाठी ऑनलाइन सातबारा सादर करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल होती. परंतु कोरोना महामारीमुळे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी तलाठी आणि शेतकरी यांना कोरोनाची लागण झाली असल्याने सातबारा ऑनलाइन होऊ शकला नाही. परिणामी त्यांच्या रब्बीतील धानाची ऑनलाइन सातबारावर नोंद झाली नाही. त्यामुळे सातबारावर ऑनलाइन नोंदणी करण्याची तारीख पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी आमदार विनोद अग्रवाल यांनी अन्न व नागरी पुरवठा सचिव विलास पाटील यांच्याकडे मुंबई येथे भेटीदरम्यान केली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील धान खरेदीचे उद्दिष्ट ३० लाख क्विंटल निर्धारित केले आहे. परंतु सद्य:परिस्थितीत जिल्ह्यात एकूण २ लाख ५० हजार क्विंटल क्षमतेचे गुदाम उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले धान खरेदी होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. अशी शंका आमदार विनोद अग्रवाल यांनी अन्न आणि नागरी पुरवठा सचिव विलास पाटील यांच्यापुढे व्यक्त केली. त्यावर विलास पाटील यांनी गरज पडल्यास खासगी गुदामे भाडेतत्त्वावर घेऊन शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात येईल, असे आश्वासन आमदार अग्रवाल यांना दिले. धान खरेदीसंबंधी विविध समस्या शेतकऱ्यांना मागील काही महिन्यांपासून उद्भवत आहेत. सर्व गुदामे पूर्णपणे भरले असल्याने धान ठेवण्यासाठीही जागा उपलब्ध नाही. खरीप हंगामामधील धान खरेदीसुद्धा पूर्ण होऊ शकली नाही. याबाबत वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधण्याचाही प्रयत्न केला गेला. संपूर्ण जिल्ह्यात एक लाख क्विंटल धान खरेदी करण्याची क्षमता आहे. परंतु अद्याप खरीप हंगामातील धान उघड्यावर पडले असून, पावसाळा सुरू होण्यास मात्र ३० दिवस उरलेले आहेत. यामुळे उघड्यावर ठेवण्यात आलेले धान पावसामुळे खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
......
अन्न व नागरी पुरवठा सचिव शुक्रवारी गोंदियाच्या दौऱ्यावर
खरीप हंगामात शेतकऱ्यांना कित्येक समस्यांना सामोरे जावे लागत होते. परंतु कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात आता धान खरेदी न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा आमदार विनोद अग्रवाल यांनी अन्न आणि नागरी पुरवठा सचिव विलास पाटील यांना दिला आहे. त्यावर अन्न व नागरी पुरवठा सचिव विलास पाटील यांनी समस्यांचा आढावा घेण्यासाठी गोंदिया येथे येणार असल्याचे सांगितले.