गोंडमोहाडी-अत्री रस्ता गेला खड्ड्यात
परसवाडा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गोंडमोहाळी-अत्री-दवनीवाडा रस्त्याचे काम ४ मार्च रोजी पूर्ण झाल्याचे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेकडून सांगण्यात आले आहे; पण रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले नसून, पाच महिन्यांत संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे या रस्त्यावर वाहतूक करणे धोकादायक ठरत आहे. अशातच अपघात घडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अर्धवट बांधकामाचा बसतोय फटका
गोरेगाव : गोंदिया-बल्लारशा रेल्वेमार्गावर फाटक नसलेल्या ठिकाणी अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातच अपुऱ्या मनुष्यबळाअभावी रेल्वेमार्गावर फाटक उभारण्यास अडचणी निर्माण होत असल्याने रेल्वे विभागाकडून मागील १० ते १५ वर्षांपूर्वी अनेक रेल्वेमार्गावर बोगद्याचे काम सुरू आहे; पण हे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याने याचा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
रासायनिक भाज्यांमुळे आजारांत वाढ
सौंदड : शेतकरी रासायनिक खाताचा वापर करीत असल्यामुळे सुपीक शेतीवर परिणाम होऊ लागला आहे. अधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतांसोबत दिवसेंदिवस महागड्या कीटकनाशकांचा वापर होऊ लागला आहे. यामुळे आजारांत वाढ झाली आहे. यावर तोडगा म्हणून सेंद्रिय शेती करण्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे.
कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी
सडक-अर्जुनी : मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ वर कोहमारा गाव आहे. मात्र, कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची कुठलीही सोय नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवा
गोरेगाव : शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात उखडलेले असून, त्यावर खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात त्यामुळे नागरिकांना रहदारीला फारच त्रास होतो. रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याची मागणी आहे.
वातावरणातील बदलामुळे भीती
तिरोडा : वातावरणातील बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप व डोकेदुखी यासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मात्र नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे.
बाजारातील रस्ते मोकळे करा
गोंदिया : बाजारपेठेतील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. त्यातही दुकानदार त्यांच्या दुकानातील सामान व बोर्ड रस्त्यावर आणून ठेवतात. नागरिकांना रस्त्याने ये-जा करण्यासाठी रस्ते अडचण होते.
दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर
गोंदिया : येथील रेल्वेस्थानकलगत प्रभूरोडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. कित्येकदा त्यातून दुर्गंधीसुद्धा पसरते. त्यातूनच नागरिकांना आपली नाक दाबून ये-जा करावी लागते.