मोरगाव : तालुक्यातील युवकांना रोजगार मिळावा, यासाठी शासनाने उद्योगांसाठी जागा उपलब्ध करून दिली. मात्र, मोठ्या उद्योगाचा पत्ता नाही. त्यामुळे तालुक्यात बेरोजगारांची संख्या वाढत असून, स्थानिक युवकांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे. तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. मात्र, धानावर आधारित उद्योग नसल्याने युवकांच्या हाताला काम मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे बेरोजगारांनी काम मिळवून देण्याची मागणी केली जात आहे.
बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी
केशोरी : येथील बसस्थानक परिसरातील जागेत खासगी व्यावसायिकांनी दुकाने थाटून शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यामुळे परिवहन मंडळाची बस परत फिरविण्यासाठी जागा शिल्लक राहत नसल्याने बसस्थानकावर वाहतुकीची कोंडी होत आहे. येथील ग्रामपंचायत प्रशासन दुकानदारांचे हित जोपासून अतिक्रमण हटविण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे.
अर्धवट बांधकामाचा बसतोय फटका
गोरेगाव : गोंदिया-बल्लारशा रेल्वेमार्गावर फाटक नसलेल्या ठिकाणी अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातच अपुऱ्या मनुष्यबळाअभावी रेल्वेमार्गावर फाटक उभारण्यास अडचणी निर्माण होत असल्याने रेल्वे विभागाकडून मागील १० ते १५ वर्षांपासून अनेक रेल्वे मार्गांवर बोगद्यांचे काम सुरू आहे; पण हे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याने याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
व्यायामशाळा उभारण्याची मागणी
सालेकसा : तालुक्यातील काही गावात व्यायामशाळा नसल्याने युवकांची अडचण होत आहे. त्यामुळे व्यायामशाळा मंजूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. तालुक्यातील अनेक गावात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून व्यायामशाळा निर्माण झाल्या आहेत. मात्र, अजूनही काही गावात व्यायामशाळा नाहीत. या वर्षी कोरोनामुळे व्यायामशाळांवर निर्बंध आले आहेत. मात्र, भविष्यात गावातील युवकांना व्यायाम करण्यासाठी सोपे होईल.
शहरात कोरोनाच्या नियमांची पायमल्ली
गोंदिया : कोरोनाला हरविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र राज्य सरकारने लागू केलेल्या नवीन नियमांनंतर कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होत आहे.
दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर
गोंदिया : येथील रेल्वे स्थानकालगत प्रभू रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. कित्येकदा त्यातून दुर्गंधीसुद्धा पसरते. त्यामुळे या परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण तयार होते.
कामगारांची योजना पूर्ववत सुरू करा
गोंदिया : कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम करणाऱ्या मजुरांना थेट पाच हजार रुपये देण्याची योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी कामगारांकडून होत आहे.
वृक्षतोडीनंतर वृक्षांची सर्रास वाहतूक
अर्जुनी-मोरगाव : शेतशिवारासह जंगलात असलेल्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड सुरू झाली आहे. अशी वृक्षतोड करताना वनविभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे.
महिलांना जनधनच्या मानधनाची प्रतीक्षा
गोरेगाव : गरीब महिलांना आर्थिक बळ म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत महिलांच्या जनधन बचत खात्यात अनुदान जमा केले होते. मात्र, आता अनुदान जमा झालेले नाही.
ग्रामीण भागात माकडांची दहशत
पांढरी : सगळीकडे शेतीची कामे सुरू आहेत. शेतात नागरिकांची उपस्थिती असल्यामुळे माकडांनी गावाकडे धाव घेतली असून ते गावात येऊन घर व भाजीपाल्याचे नुकसान करीत आहेत.
रेल्वे चौकीला उड्डाणपुलाची प्रतीक्षा
आमगाव : गोंदिया-आमगाव राज्यमार्गावर किडंगीपार येथील मुंबई-हावडा मार्गावर असलेली रेल्वे चौकी मालवाहतूक व प्रवासी वाहनांसाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावरील रेल्वे चौकीवर उड्डाणपुलाची मागणी प्रलंबित आहे. जनप्रतिनिधी नेहमी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
डिझेलच्या दरवाढीने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर
केशोरी : केंद्र सरकारने डिझेलचे भाव वाढविल्यामुळे सर्व क्षेत्रांसह शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. विदर्भातील गोंदिया, भंडारा या दोन जिल्ह्यांमध्ये धानपिकासह इतरही पिकांचे उत्पन्न घेण्यासाठी वर्षभर शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची मशागत करतात. शेतीच्या मशागतीसाठी वापरात येणारे महत्त्वाचे साधन म्हणजे ट्रॅक्टर होय. पण, आता महागाईमुळे ट्रॅक्टरद्वारे मशागत करणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
कामगारांची योजना पूर्ववत सुरू करा
नवेगावबांध : कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत इमारत बांधकाम करणाऱ्या गरीब मजुरांना थेट पाच हजार रुपये देण्याची योजना पूर्ववत करण्याची मागणी खराशी व परिसरातील बांधकाम कामगारांनी केली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत इमारत व इतर बांधकामे बंद झाली होती. परिणामी, बांधकाम कामगारांना रोजगार मिळेनासा झाला.
शिपाईपद भरतीची वयोमर्यादा वाढवा
आमगाव : मागील २-३ वर्षांपासून पोलीस शिपाई भरतीप्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुण बेरोजगार असून, ते पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांच्या दृष्टिकोनातून पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ३३ वरून ३५ वर्षं करण्यात यावी, अशी मागणी बेरोजगार तरुणांनी केली आहे.
घोगरा ते देव्हाडा रस्त्यांची दुरवस्था
मुंडीकोटा : जवळील ग्राम घोगरा ते देव्हाडा रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, या रस्त्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. हा रस्ता अपघाताला आमंत्रण ठरत आहे. घोगरा ते देव्हाडा या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले दिसत आहेत. गिट्टी व मुरूम उखडून बाहेर रस्त्याच्या कडेला पडलेले आहे. हा रस्ता पूर्णपणे जीर्ण आहे.
वृक्षतोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष
सडक-अर्जुनी : वनसंपदेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यातील वनांमध्ये मोठ्या प्रमाणात वनतस्कर व शिकाऱ्यांची वहिवाट असल्याचे दिसून येते. वनविभागाचे वनांकडे दुर्लक्ष असल्याची वनतस्करांनी संधी साधून जंगलातील वनसंपदा तोडण्याचा सपाटा सुरू केला आहे. शिकाऱ्यांमुळे वन्यप्राण्यांचेही जीव धोक्यात आले आहेत. वनविभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
फवारणीची गरज
देवरी : पावसाचे आगमन होऊनही डासांचा जोर कमी झालेला नाही. अशात फवारणीची गरज आहे.