बोंडगावदेवी : वनपरिक्षेत्र कार्यालय अर्जुनी मोरगाव अंतर्गत येणाऱ्या तिडका व धाबेटेकडी येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीला संत तुकाराम वनग्राम योजनेतील राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार प्राप्त झाला. नागपुर येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तालुक्यातील दोन्ही गावांना शुक्रवारी (दि.२९) पुरस्कार देवून गौरविण्यात आले. वनपरिक्षेत्र कार्यालय अर्जुनी मोरगाव अंतर्गत धाबेटेकडी व तिडका गावामध्ये मागील काही वर्षापूर्वी ग्रामस्थांच्या सहकार्याने संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांचे गठण करण्यात आले. वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ‘माझे गाव, माझे जंगल’ ही भावना जोपासून वनांचे संरक्षण करण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला. गावामध्ये कुऱ्हाड बंदी अभियान राबविण्यात आले. वन समितीच्यावतीने संयुक्त वनीकरण, मृद व जलसंधारण, वनसंरक्षण, वन वणवा प्रतिबंधक उपाय, वन जमिनीवरील होणाऱ्या अतिक्रमवास आळा घालणे, जंगलामध्ये गुरे चराईवर प्रतिबंध, वन्य पशुपक्षी संरक्षण, पानवठा, वनसंरक्षणात जनतेचा सहभाग, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती असे विविध उपक्रम धाबेटेकडी व तिडका येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्यावतीने राबविण्यात आले. गावकऱ्यांना जंगलाविषयी प्रेम वाटावे म्हणून वनविभागाच्या माध्यमातून ग्रामस्थांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या. अवैधपणे वृक्ष तोडीवर आळा बसावा म्हणून दोन्ही गावांना वन समितीच्यावतीने गॅस कनेक्श्नचे वाटप करण्यात आले. युवकांना वाचनाची सवय लागावी म्हणून वाचनालयाची गावामध्ये सोय उपलब्ध करुन देण्यात आली. लग्न समारंभात लाकडांची तोड होऊ नये म्हणून लोखंडी पाईपसह तीन मंडप शामियाना गावकऱ्यांना वन समितीच्यावतीने उपलब्ध करुन देण्यात आला. शेकडो क्वींटल मोहफुल खरेदी करुन गावकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली. असे विविध उपक्रम राबविल्यामुळे तिडका येथील वन व्यवस्थापन समितीला सन २०१३-१४ चा संत तुकाराम वनग्राम योजनेतील राज्यस्तरीय तृतीय तसेच २०१४-१५ मधील राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार धाबेटेकडी वन समितीला प्राप्त झाला. संत तुकाराम वनग्राम योजनेतील तृतीय पुरस्कार मिळविल्याबद्दल धाबेटेकडी व तिडका येथील वनसमिती पदाधिकाऱ्यांचे जिल्हा उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, परिविक्षाधीन वन अधिकारी राहुल पाटील यांनी अभिनंदन केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान शुक्रवारी (दि.२९) नागपुर येथे एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वनविभागाचे प्रधान सचिव विकास खरगे आदिंच्या हस्ते धाबेटेकडी व तिडका येथील वनसमिती पदाधिकाऱ्यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. पुरस्कार स्विकारताना अर्जुनी-मोरगावचे वनपरिक्षेत्राधिकारी सी.जे. रहांगडाले, वनसमितीचे अध्यक्ष अशोक लंजे, महादेव रामटेके, वनरक्षक प्रधान प्रामुख्याने उपस्थित होते.
तिडका व धाबेटेकडीचा गौरव
By admin | Published: July 31, 2016 12:27 AM