गोंदिया - शहर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या छोटा गोंदियातील दत्त मंदिराजवळ राहणाऱ्या विजय रमेश बिसेन (४०) या दुग्ध डेअरी चालकाची पाच लाखांची फसवणूक करण्यात आली. ही फसवणूक २३ व २४ ऑक्टोबर रोजी करण्यात आली; परंतु ही बाब २७ ऑक्टोबर रोजी त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी गोंदिया शहर पोलिस ठाणे गाठून यासंदर्भात तक्रार केली. या प्रकरणात ४ लाख ८९ हजार ९९६ रुपयांची फसवणूक करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार २३ ऑक्टोबर रोजी विजय रमेश बिसेन (४०), रा. छोटा गोंदिया, दत्त मंदिराजवळ गोंदिया यांचा फोन पे चालत नसल्यामुळे त्यांनी गुगल या वेबसाइटवर जाऊन फोन पे कस्टमर केअरचा क्रमांक शोधला असता त्यांना एक क्रमांक मिळाला. त्या क्रमांकावर बिसेन यांनी २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता फोन करून त्यांच्या फोन पे ॲप्लिकेशन चालू होत नसल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी त्यांचे आधारकार्ड क्रमांक व खाते क्रमांक मागितला. ती माहिती त्याला देण्यात आली. त्यांच्या एचडीएफसी खात्यातून ४ लाख ८९ हजार ९९६ रुपये ऑनलाइन ट्रान्झेक्शन करून वळते केले. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीवर भादंविच्या कलम ४२० सहकलम ६६ माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी करीत आहेत.
दोन दिवसांत केले आठ ट्रान्झेक्शनछोटा गोंदियातील विजय रमेश बिसेन (४०) यांच्या खात्यातून दोन दिवसांत आठ वेळा ट्रान्झेक्शन करून तब्बल ४ लाख ८९ हजार ९९६ रुपयांची फसवणूक करण्यात आली. २३ ऑक्टोबर रोजी ४९ हजार ९९९ रुपये प्रत्येकी तीन वेळा, असे १ लाख ४९ हजार ९९७ रुपये, तर २४ ऑक्टोबर रोजी तीन वेळा ५०-५० हजार, चौथ्या वेळी ९९ हजार ९९९ रुपये व पाचव्या वेळी ९० हजार, असे एकूण ४ लाख ८९ हजार ९९६ रुपये ऑनलाइन ट्रॉन्झेक्शन करून काढले.
म्हणे २४ तासांत ॲप्लिकेशन सुरू होईलविजय बिसेन यांनी फाेन पे च्या कस्टमर केअर क्रमांकावर तक्रार करून फोन पे चालत नसल्याचे सांगितले. त्यावर माहिती घेऊन त्या व्यक्तीने २४ तासांत हे ॲप्लिकेशन सुरू होणार असल्याचे सांगितले. २४ तास झाल्यानंतरही त्यांच्या मोबाइल फोनवरील फोन पे ॲप्लिकेशन सुरू झाले नाही. त्यांनी २७ ऑक्टोबर रोजी गोंदियातील एचडीएफसी बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांच्या खात्यातून दोन दिवसांत आठ वेळा ट्रान्झेक्शन होऊन पाच लाख रुपये अज्ञात आरोपीने वळविल्याची बाब त्यांच्या लक्षात आली.
पंधरवड्यातील दुसरी घटनागोंदिया शहरात ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या या पंधरवड्यात दोन घटना घडल्या असून, या दोन घटनांमधूनच १३ लाख ३३ हजार रुपये पळविण्यात आले आहेत. शहरातील गणेशनगरातील सुबोध चौकात राहणारे उपअभियंता पवन दिलीप फुंडे (३०) यांच्या खात्यातून ८ लाख ४५ हजार ऑनलाइन ट्रान्सफर केल्याची तक्रार १४ ऑक्टोबर रोजी करण्यात आली होती. आता दुसरी तक्रार २७ ऑक्टोबर रोजी करण्यात आली आहे. या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.