आमगाव : कोरोना विरोधाच्या लढ्यात आता आरोग्य विभागाच्या हाती लस आली असून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. अशात बनगाव येथील आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. आरोग्य कर्मचारी आता नागरिकांच्या लसीकरणासाठी सज्ज झाले आहेत. अशात येथील सेवानिवृत्त प्राचार्य एच. के. फुंडे व सुलोचना फुंडे यांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली व त्यांनी देव देवळाबाहेर येऊन जीवदान देण्याचे कार्य करीत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून आरोग्य कर्मचाऱ्यांवरील विश्वास दाखविला.
मागीलवर्षी कोरोना महामारीमुळे अनेकांचे कुटुंब हिरावले गेले. त्याकाळात परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे कार्य आरोग्य विभागातील देवदूतांनी जीवाची पर्वा न करता केले. तसेच सध्या लसीकरणाच्या राष्ट्रीय कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सेवक सेविका, आशा सेविका इतर कर्मचारी देवदूत बनून नागरिकांचे जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या मोहिमेला नागरिकांनी आपली जबाबदारी समजून सहकार्य करावे, असेही मत फुंडे यांनी व्यक्त केले. बनगाव येथील केंद्रात ४९१ नागरिकांना लस देण्यात आली आहे. लसीकरणाच्या राष्ट्रीय मोहिमेला यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. ताम्रध्वज नागपुरे, डॉ. निखिल उईके, डॉ. गणेश बाहेती, डॉ. मृदुला टावरी, वर्षा बांबल, रेखा गाढवे, पूजा सूर्यवंशी, देवेश्वरी पाथोडे, वर्षा बोपचे, सत्वशिला पारधी, इमला बिसेन, प्रतिभा मेश्राम, विनोद कटरे, अमिता सलामे, सरिता अंबुले, रहांगडाले सहकार्य करीत आहेत.