नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपण कुटुंबासह बाहेरगावी जात असाल, तर सावध व्हा, आपल्या कुलूपबंद दारावर आपल्या कुणाची नजर नाही; परंतु रात्री घरफोडी करणाऱ्या चोरट्यांची नजर आहे. चोरटे त्या कुलूपबंद घरांचे दिवसभर निरीक्षण करून रात्रीच्या वेळी घरफोडी करतात. आपण कुटुंबासह बाहेरगावी जात असाल तर आपल्या घराची राखण करण्यासाठी एखादा नातेवाईक घरी ठेवावा तरच घर सोडावे, अन्यथा आपल्या घरातील पैसे, मौल्यवान दागिने चोरटे चोरून नेतील. चोरी करणाऱ्या टोळीतील आरोपी हे दिवसाला शहरात किंवा गावात गल्लीतून वारंवार फेरफटका मारतात. दिवसा सकाळी बंद असलेल्या घराचे निरीक्षण ते वारंवार करतात. रस्त्याने जाताना ते त्या घरात जाण्याचा मार्ग, त्या घरात प्रवेश कुठून करता येणार, चोरी केल्यावर कुणी आले तर आपल्या कुठून पळून जाता येईल, याचा अभ्यास चोरटे करतात. रात्री त्या घरात तीन-चार सदस्य जाऊन चोरी करतात. लाखोंचा ऐवज पळवून नेतात. सध्या गोंदिया जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून दागिने स्वच्छ करणारी टोळी आली आहे. दागिने स्वच्छ करण्याच्या नावावर महिलांची नजर चुकवून दागिने पळवून नेत आहेत. दोन महिन्यांपासून ही टोळी गोंदिया जिल्ह्यात तिरोडा, गोरेगाव व गोंदिया या तीन तालुक्यांतच फिरत असून, पोलिसांनी या टोळीला अद्याप अटक केली नाही.
आठ महिन्यांत ४० घरफोड्या- गोंदिया जिल्ह्यात सन २०२१ मध्ये आठ महिन्यांत ४० घरफोड्या घडल्या आहेत. या ४० घरफोड्यांपैकी काही घरफोड्यांचे आरोपी पोलिसांनी पकडले, तर अनेक घरफोड्यांमधील आरोपी मोकाट आहेत. - स्थानिक गुन्हे शाखा व संबंधित पोलीस ठाणे उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांना उघड करण्याचा प्रयत्न करीत असले तरी पोलिसांना चकमा देऊन चोरटे हात साफ करीत आहेत.- मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा घरफोड्यांचे प्रमाण कमी होते; परंतु आता दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणात घरफोड्या वाढल्याने वर्षाच्या अखेरपर्यंत हा चोऱ्यांना आकडा फुगण्याची चिन्हे दिसत आहेत.
अनलॉकनंतर चोऱ्या वाढल्या- कोरोनामुळे बेरोजगारी वाढली, पैशाच्या हव्यासापायी तरुण मंडळी वाममार्गाला लागली आहे. चोऱ्या करून आपले शौक पूर्ण करण्याचे काम करतात.- कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक चणचण निर्माण झाली, काम कुणी देईना मग पोटाची आग विझविण्यासाठी अनेकांनी चोरी, लुटमारी या कामाला सुरुवात केली आहे.
१८१ घरफोड्यांचा तपास सुरूच- सन २०१९ मध्ये झालेल्या १६० पैकी फक्त ३० घरफोड्या उघडकीस आल्या आहेत, तर १३० घरफोड्या उघडकीस आल्या नाहीत. - सन २०२० मध्ये ८० घरफोड्या झाल्या असून, २९ घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. ५१ घरफोड्या उघडकीस आल्या नाहीत. जुन्या १८१ घरफोड्यांचा तपास सुरूच आहे.