गोंदिया : जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस घट होत असून, मंगळवारी (दि.१४) जिल्ह्यातील तापमान १३ अंश सेल्सिअसवर आले होते. विशेष म्हणजे, आतापर्यंत सर्वात थंड जिल्हा म्हणून दुसऱ्या क्रमांकावर राहणार गोंदिया जिल्हा मंगळवारी प्रथम क्रमांकावर आला होता. यामुळे आता गुलाबी थंडीला सुरुवात झाल्याचे दिसत असून, त्याचा अनुभव सुद्धा जिल्हावासीयांना येत आहे.
यंदा हिवाळा सुरू झाला असूनही आतापर्यंत पाहिजे तशी थंडी पडलेली नाही. तापमानाची चढ-उतार सुरूच असून, यंदाचा हिवाळा नेमका कसा जाणार हेच समजेनासे झाले आहे. यामुळेच गुलाबी थंडीची खरी मजा जिल्हावासीयांना अनुभवता आलेली नाही. मात्र आता जिल्ह्यातील तापमानात घट होत असताना दिसत असून, थंडीही जाणवू लागली आहे. रविवारी (दि.१२) जिल्ह्याचे तापमान १४.६ अंश सेल्सिअस नोंदण्यात आले, तर सोमवारी (दि.१३) तापमान आणखी घटले असून, १३.५ एवढी नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी (दि.१४) त्यात आणखी घट झाली असून, १३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, तापमानात जसजशी घट होत आहे तसतसा थंडीचा जोर वाढताना दिसत आहे, तर दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळेही आणखी थंडी जाणवत असल्याचाही अनुभव येत आहे. यामुळेच आता जिल्हावासीयांना उबदार कपड्यांची गरज भासत आहे. दिवसेंदिवस होत असलेली तापमानातील घट बघता येत्या काही दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचे दिसत आहे.
गरम कपडे आता निघाले
सोमवारपासून जिल्ह्याचे तापमान १३ अंश सेल्सिअसच्या घरात आले आहे. त्यात मंगळवारी आणखी घट झाल्याने जिल्ह्यात थंडीने एंट्री मारली आहे. सकाळी व सायंकाळ होताच आता जिल्हावासीयांना थंडी जाणवू लागली असून, ठेवलेले गरम कपडे आता त्यांना घालावे लागत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी विदर्भात गोंदिया जिल्हा सर्वांत थंड जिल्हा होता, तर वर्धा जिल्हा १३.२ अंश सेल्सिअसवर आल्याने दुसऱ्या क्रमांकावर होता.