मुंबई - जालना पोलिसांकडून व्हिडिओ शुटिंग काढण्याच्या कारणावरून भाजप युवा मोर्चाच्या सरचिटणीसाला बेदम मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमधील घटना ९ एप्रिल २०२१ रोजी घडलेली असून पदाधिकारी गयावया करत माफी मागत आहे तर पोलिस त्यास काठ्या तुटेपर्यंत मारहाण करत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर, आता गोंदिया जिल्ह्यातही पोलिसांच्या मारहाणीत एका आरोपीचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली.
जालन्यात शिवराज नारियलवाले (रा. जालना) यांना पोलिसांनी रानटी जनावरासारखी मारहाण केली होती. याप्रकरणी भाजपा नेत्यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातले. आता, गोदिंयातही पोलिसांनी लाकडी दांड्याच्या पट्ट्याने मारहाण केल्याने आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी, पोलीस निरीक्षकांसह इतरांवर सीआयडीने गुन्हा दाखल केला आहे.
आमगाव तालुक्यातील आरोपी राजकुमार याला पोलिसांनी लाकडी दांड्याच्या पट्ट्याने मारहाण केली होती. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला असून याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. तसेच, पोलिसांचा IPC/CRPC वर विश्वास राहिला नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, जालन्यातील शिवराज नारियलवाले यांना झालेल्या अमानूष मारहाणीच्या प्रकरणात दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपा नेत्यांनी केली होती. त्यानंतर, याप्रकरणातील 5 पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे.