लोकमत न्यूज नेटवरगोंदिया : शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या दोन दिवसांपासून शहराला गढूळ पाण्याचा पुरवठा सुरू आहे. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दर दोन-तीन महिन्यांनी ही समस्या निर्माण होत असल्याने शहरवासीय त्रस्त झाले असून, यावर उपाययोजना करण्यात मजीप्राला अद्यापही यश आले नाही.
मजीप्राच्या वतीने शहरात पाणीपुरवठा केला जातो. यासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. शहरात ४२ वॉर्ड आहेत. तर घरगुती, वाणिज्यिक, संस्था व नगर परिषद असे एकूण २५ हजारांहून अधिक नळकनेक्शनधारक ग्राहक आहेत. या ग्राहकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आहे. परंतु, शहरात मागील वर्षीपासून दूषित पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे नळांना दूषित पाणीपुरवठा होत असतो. अनेक ठिकाणी पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी (पाइप) लिकेज झाल्याने दूषित पाणीपुरवठा होत असल्याची माहिती आहे. मात्र, यामुळे शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
यापुर्वीसुद्धा तक्रारीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे या भागातील नळकनेक्शनधारकांनी आठवडाभरापूर्वीसुद्धा गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. तेव्हा प्राधिकरणाने त्यावर उपाययोजना केली होती. पण, शुक्रवारपासून (दि. १४) या समस्येत पुन्हा वाढ झाल्याने नळकनेक्शनधारक त्रस्त झाले आहेत.
भूमिगत गटार योजनेच्या कामाचा परिणामशहरात भूमिगत गटार योजनेच्या कामांमुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन अनेक ठिकाणी लिकेज झाली आहे. त्यामुळेच शहरात गटार योजनेचे काम सुरू होताच दूषित पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण होत असते, असा अनुभव नागरिक घेत आहेत. काही दिवसांपूर्वी चांदणी चौक, गांधी प्रतिमा परिसरात गटार योजनेसाठी खोदकाम करण्यात आले होते आणि तेव्हापासूनच शहरातील काही भागांत दूषित पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली.
या भागाला झाला दूषित पाणीपुरवठाशहरातील गणेशनगर, बजरंगनगर, फुलचूर रोड, श्रीनगर, भीमनगर, मरारटोली, सिंधी कॉलनी, माताटोली, गणेशनगर, बजरंगनगर, गांधी वॉर्ड, सिव्हिल लाइन या भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींत वाढ झाली आहे