लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद रविवारी गोंदिया जिल्ह्यात झाली होती. त्यानंतर सोमवारी (दि.२१) सलग दुसऱ्या दिवशी गोंदियाचा पारा ७ अंश सेल्सिअसवर आल्याने गोंदिया राज्यात सर्वात कुल होता. रविवारी ७.६ तर सोमवारी ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने विदर्भातील तापमानात २४ डिसेंबरपर्यंत पुन्हा घट होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे जिल्ह्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सलग दुसऱ्या दिवशी राज्यात गोंदिया सर्वात कुल असल्याने दिवसभर हुडहुडी कायम होती. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील तापमान पुढील तीन चार दिवस कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही ठिकाणच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. परिणामी विदर्भात पुन्हा थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. रविवारी (दि.२०) गोंदियानंतर नागपूर येथे सर्वात कमी ८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर सोमवारी पुन्हा गोंदियाचा पारा ७ अंश सेल्सिअसवर आला होता. त्यामुळे वातावरणात गारवा कायम होता. दोन दिवसांपासून थंडी वाढल्याने याचा दैनदिन कामावर सुध्दा परिणाम झाला होता. सध्या जिल्ह्यात खरीप हंगामातील धानाच्या मळणीचा हंगाम सुरु असून थंडीत वाढल्याने शेतकरी सुध्दा शेतीची कामे सकाळी ९ वाजतानंतर सुरु करीत असल्याचे चित्र आहे. तर नागरिकांचे दैनिक कामाचे वेळापत्रक सुध्दा बदलले आहे.सोमवारी दिवसभर वातावरणात गारवा असल्याने हुडहुडी कायम होती. विशेष म्हणजे यंदा याच महिन्यात १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर सोमवारी ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून या मौसमातील हे सर्वात कमी तापमान होय. गेल्या दोन दिवसांपासून थंडीत वाढ झाल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र आहे. ३.५ अंश सेल्सिअसचा रेकार्ड गोंदिया येथे डिसेंबर २०१६ मध्ये ३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. हा सर्वात कमी तापमानाचा रेकार्ड आहे. यापेक्षा कमी तापमानाची नोंद मागील तीन चार वर्षात जिल्ह्यात झालेली नाही. मात्र मागील दोन दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत असून पुन्हा तीन चार दिवस तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असल्याने हा रेकार्ड तुटणार का याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.