गोंदिया: रेल्वेमध्ये पदार्थ विकणारे वेंडरचे काम करणाऱ्या मुलांमध्ये नेहमीच ग्राहकांवरुन जुंपत होती. यात मृतकने आरोपीला व त्याच्या वडीलाला मारहाण केली होती. या मारहाणीचा वचपा काढण्यासाठी त्याने मित्राच्या मदतीने चक्क दोन चाकूने भोसकून त्याचा खून केल्याची घटना १८ जनूच्या रात्री ९:३० वाजता आंबेडकर भवन, कुंभारे नगर गोंदिया येथे घडली. दद्दू उर्फ उज्वल निशांत मेश्राम (१७) रा. भिमनगर मैत्रेय बुध्दविहाराच्या मागे गोंदिया असे मृत मुलाचे नाव आहे. तर अंकित घनश्याम गुर्वे (२२) रा. सिंगलटोली, आंबेडकर वॉर्ड, शिव मंदीर जवळ गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
दद्दू मेश्राम व आरोपी अंकित घनश्याम गुर्वे हे दोघेही रेल्वेमध्ये पदार्थ विक्री करण्याचे काम करीत असत. ते पदार्थ विक्री करतांना ग्राहक आपल्यालाल मिळावे हे दोघांचे प्रयत्न राहात होते. यातून त्या दोघांमध्ये जुंपत होती. दद्दू मेश्राम याने अंकीत व त्याचे वडील घनश्याम गुर्वे या बापलेकांनाही मारहाण केली होती. या गोष्टीचा राग अंकीतच्या मनात होता. अंकीतने १८ जून रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास राहुल प्रशांत शेंडे (२१) रा. सिंगलटोली, आंबेडकर वॉर्ड गोंदियाच्या याच्या मदतीने चाकूने मारून त्याचा खून केला. या घटनेसंदर्भात मंजू निशांत मेश्राम (३२) रा. भीमनगर, मैत्रेय बुद्ध विहारच्या मागे गोंदिया यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तपासासाठी पाच पथके
या खून प्रकरणातील आरोपींना तत्काळ पकडण्यासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी खून प्रकरणातील गुन्हेगारांचा कशोशिने शोध घेऊन गुन्हेगारांना तत्काळ जेरबंद करण्याचे आदेश दिले. उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या निर्देशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, शहरचे ठाणेदार चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथक अशी विविध पथके सदर खून प्रकरणाचा उलगडा करण्याकरीता नेमण्यात आली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस हवालदार राजू मिश्रा, महेश मेहर, भुवनलाल देशमुख, चित्तरंजन कोडापे, प्रकाश गायधने, इंद्रजित बिसेन, रियाज शेख, विनोद गौतम, घनश्याम कुंभलवार, लक्ष्मण बंजार, शहर ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, पोलीस उपनिरीक्षक घनश्याम थेर, पोलीस हवालदार जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, निशिकांत लोदासे, दिपक रहांगडाले, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, पोशि दिनेश बिसेन, मुकेश रावते, सुभाष सोनवाने, कुणाल बारेवार यांनी कामगिरी केली आहे.
एक अटक एक फरार
या पथकांनी आरोपी अंकित घनश्याम गुर्वे (२२) रा. सिंगलटोली, आंबेडकर वॉर्ड, शिव मंदीर जवळ, गोंदिया याला अटक केली आहे. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी राहुल प्रशांत शेंडे (२१) रा. सिंगलटोली, आंबेडकर वॉर्ड, गोंदिया हा फरार आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम करीत आहेत.