दिलीप चव्हाण
गोरेगाव (गोंदिया) : एक संपूर्ण पोळी खाणे म्हणजे विकृती आणि ती अर्धी-अर्धी वाटून खाणे म्हणजे संस्कृती. गोरेगाव तसे दानवीरांचे शहर. या शहरात लांबून आलेले शासकीय कर्मचारीही दानवीर. गुरुवारी (दि.१७) ‘मुलीच्या उपचारासाठी दिव्यांग आईवडिलांची केविलवाणी धडपड’ या आशयाची बातमी ‘लोकमत’ने समाजापुढे मांडली आणि सुरू झाला मदतीचा ओघ.
७व्या वर्गात शिकणारी डिंपल डोळ्यांनी ४० टक्के दिव्यांग आहे. शस्त्रक्रिया करून डिंपलचे डोळे बरे होऊ शकतात. म्हणून गोंदिया येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डिंपलला पुढील शस्त्रक्रियेसाठी नागपूरच्या शासकीय रुग्णालयात रेफर केले होते. पण घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे दिव्यांग आईवडील दिव्यांग मुलीसाठी चिंताग्रस्त होते. हा सारा घटनाक्रम दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष शामसुंदर बन्सोड यांनी ‘लोकमत’ प्रतिनिधींच्या लक्षात आणून दिला.
‘लोकमत’च्या माध्यमातून ग्राम कुऱ्हाडी येथील दिव्यांग कुटुंबाची व्यथा मांडून समाजाला मदतीचे आवाहन करण्यात आले. त्यादिशेने अनेक दानवीर पुढे आले व जमेल ती मदत त्यांनी केली. यात गोरेगावचे तहसीलदार सचिन गोस्वावी, ठाणेदार सचिन मैत्रे, खंडविकास अधिकारी अजितसिंग पवार यांनी मदतीसाठी हात पुढे केले. आता डिंपलच्या डोळ्यांचा शस्त्रक्रियेचा प्रश्न सुटणार व लवकरच डिंपलची शस्त्रक्रिया होणार आहे.
कोहमारावरून आलेले पती-पत्नी देवदूत
डिंपलच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले होते. त्यादिशेने कोहमारा येथील बालकिशन कद्रेवार आणि त्यांची पत्नी पद्मा कद्रेवार यांनी बातमी वाचून थेट कुऱ्हाडी हे गाव गाठले. राजेश टेभुर्णीकर यांचे घर शोधून मदत करण्याची इच्छा जाहीर केली. पण डिंपल आणि तिचे वडील गोरेगाव पोलीस स्टेशन येथे गेल्याची माहिती त्यांना देण्यात आली. यावर कद्रेवार यांनी पोलीस स्टेशन गाठून पाच हजार रुपयांची मदत करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. विशेष म्हणजे, बालकिशन कद्रेवार हे एका खासगी दुकानात मोलमजुरीचे करतात, पण तरीही कोहमारावरून ते गोरेगावला स्वखर्चाने येतात, मदत करतात. यावरून समाजात असेही लोक जिवंत आहेत जे दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव ठेवतात याची प्रचिती आली.
मुलीच्या उपचारासाठी दिव्यांग आईवडिलांची केविलवाणी धडपड; शासनाच्या सवलती कागदावरच
कुऱ्हाडी येथील दिव्यांग कुटुंब शासनाच्या सोयी-सुविधांपासून वंचित आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने साधी झोपडीही या कुटुंबासाठी बांधून दिली नाही. प्रधानमंत्री आवास योजनेतून निदान झोपडीची व्यवस्था तरी प्रशासनाने करून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
‘लोकमत’ला बातमी प्रकाशीत झाल्यानंतर अनाथांच्या आई डाॅ. सविता बेदरकर यांनी आस्थेने टेभुर्णीकर कुटुंबाची विचारपूस केली व लवकरच मदतीसाठी येणार असल्याचे सांगितले. शुक्रवारी (दि.१८) ठाणेदार मैत्रे यांच्या हस्ते डिंपलच्या हाती मदतनिधी सोपविण्यात आला. यावेळी दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष बन्सोड, सामाजिक कार्यकर्ते आनंद चंद्रिकापुरे, सहायक फौजदार राजकुमार पवार, ‘लोकमत’ प्रतिनिधी दिलीप चव्हाण, प्रमोद न्यायकरे आदी उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"