गोंदिया : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन व वैद्यकीय यंत्रणा कामाला लागली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांटची निर्मिती होणार आहे. तसेच तालुक्यातील आरोग्य केंद्रातील उपलब्ध खाटांना ऑक्सिजनशी जोडणी करण्याचे कार्य सुरू आहे. कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात बुधवारी (दि.१६) कोविड-१९ रोग प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत आढावा सभेत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप गेडाम उपस्थित होते. पुढे बोलताना खवले यांनी कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे व हात वारंवार स्वच्छ करणे या त्रिसूत्रीमुळेच कोरोनावर मात करणे शक्य आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या असून, यासाठी जिल्ह्यातील नागरिकांचे प्रशासनाला सहकार्य अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले. सभेला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
-----------------------
विशेष सोयी-सुविधांवर भर
सडक-अर्जुनी येथे १०० खाटांचे सर्व सोई-सुविधांयुक्त रुग्णालय उभारले जाणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांवरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात ६५ व बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात ३५ असे एकूण १०० खाटांचे बालकांसाठी वाॅर्ड तयार करण्यात येत आहेत. औषधसाठा, प्राणवायू उपलब्ध ठेवणे, टेस्टिंग वाढविणे, व्हॅक्सिनेशन वाढविणे व मृत्यूदर कमी करणे याला प्राधान्य राहणार असल्याचे खवले यांनी सांगितले.