लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनामुळे देशात मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. देश आणि राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासन आणि प्रशासन युध्द पातळीवर प्रयत्न करीत आहेत. हा लढा आणखी बळकट करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. देशाप्रती असलेली आपली सामाजिक बांधलकी जपत गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी सरकारला मदतीचा हात देत ८ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाने सर्वसंमत्तीने देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सरकारच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. कोरोना विरुध्द लढा देण्यासाठी संचालक मंडळाने ५ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधी जमा करण्यात येणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैन यांनी सांगितले. बँकेच्या संचालक मंडळापाठोपाठ बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन कोरोना विरुध्दचा लढा अधिक सक्षम करण्यासाठी देण्याचा निर्णय कर्मचारी संघटेनेचे अध्यक्ष सुनील कन्नमवार व सचिव किशोर यांनी घेतला असल्याचे बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुरेश टेटे यांनी सांगितले. जिल्हा बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे एक दिवसाच्या वेतनाचा ३ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार आहे.गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली असून संकटकालीन परिस्थिती नेहमी धावून जाण्याचा परिचय दिला आहे.विशेष काही दिवसांपूर्वीच संचालक मंडळाने कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक कजार्ची परतफेड करण्यास तीन महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. यामुळे जिल्ह्यातील ३६ हजारावर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी कोरोना विरुध्दच्या लढ्यासाठी दिलेल्या मदतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.कोरोनामुळे देशात संकटकालीन परिस्थिती निर्माण झाली आहे.राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. शासन आणि प्रशासन याविरुध्द सक्षमपणे लढा देत आहे. हा लढा अधिक सक्षमपणे लढता यावा यासाठी बँकेच्या संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी एकूण ८ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.- राजेंद्र जैन,अध्यक्ष गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक