लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेला कोरोना बाधित बुधवारी (दि.१०) कोरोनामुक्त झाला. त्यामुळे आता गोंदिया जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला असून २१ दिवसांच्या कालावधीत ६८ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आता एकही कोरोना बाधित रुग्ण नसून आता जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त कसा ठेवता येईल हे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.२६ मार्चला गोंदिया जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर हा रुग्ण बरा होवून एप्रिल महिन्यात घरी परतला. तब्बल ३८ दिवस जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊनमुळे विविध राज्यात आणि जिल्ह्यात अडकून असलेल्या मजूर आणि नागरिकांना त्यांच्या स्वगृही जाण्याची परवानगी दिली. त्यामुळे मुंबई, पुणे आणि इतर रेड झोनमधील नागरिक स्वगृही परतले. यामुळे कोरोना संसगार्चा धोका वाढला. मुंबई, पुण्याहून आलेल्या नागरिकांमुळे १९ मे रोजी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ६८ वर पोहचली. विशेष म्हणजे हे सर्व कोरोना बाधित ग्रामीण भागातील असल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील चांगले असल्याने २१ दिवसांच्या कालावधीत सर्वच कोरोना बाधित कोरोनामुक्त झाले. मंगळवारी गोंदिया येथील कोविड केअर सेंटरमधील दोन कोरोना बाधितापैकी एक जण कोरोनामुक्त झाला. त्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये केवळ एकाच कोरोना बाधितावर उपचार सुरू होता. बुधवारी तो सुध्दा कोरोनामुक्त झाल्याने त्याला कोविड केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात आता एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याने जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. निश्चितच ही जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे.
प्रशासनासमोर कोरोनामुक्त ठेवण्याचे आव्हानतब्बल २१ दिवसांच्या कालावधीनंतर गोंदिया जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे जिल्हा यापुढेही कसा कोरोनामुक्त राहील यासाठी जिल्हा आणि आरोग्य प्रशासनाला उपाययोजना करण्याची गरज आहे. बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाऱ्या नागरिकांवर बारीक नजर ठेवून त्यांची सीमा तपासणी नाक्यावर आरोग्य तपासणी करण्याची गरज आहे.कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर असणार आहे.
कोविड केअर सेंटरमध्ये आनंदाचे वातावरणयेथील जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये मागील २१ दिवसात एकूण ६८ कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करण्यात आले होते. मात्र यानंतर हळूहळू रुग्ण बरे होवून परत गेल्याने केवळ एका कोरोना बाधितावर उपचार सुरू होता. पण बुधवारी (दि.१०) तो कोरोना बाधित सुध्दा कोरोनामुक्त झाल्याने कोविड केअर सेंटरमध्ये आता एकही कोरोना बाधित नाही. बुधवारी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला सुटी देताना येथील डॉक्टर आणि परिचारिकांनी कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. एकंदरीत कोविड केअर सेंटरमध्ये आनंदाचे वातावरण होते.
१०६० स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्हकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण ११२९ जणांचे स्वॅब नमुने घेवून नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ६८ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह तर १०६० स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे.