लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात तलाव मोठ्या प्रमाणात असल्याने दरवर्षी हिवाळ्याच्या सुमारास विदेशी पक्ष्यांचे मोठ्या संख्येने आगमन होते. सुमारे दीड ते दोन महिने या पक्ष्यांचा जिल्ह्यात मुक्काम असतो. जलाशयालगत त्यांचा सर्वाधिक अधिवास असतो. मात्र, त्यांना पुरेसे अन्न उपलब्ध होत नसल्याने त्यांची संख्या रोडावत चालली आहे. हीच बाब लक्षात घेत गोंदिया वन विभाग व पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी काही जलाशयालगत दहा प्रकारचा चारा लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विदेशी पाहुण्यांना आता जिल्ह्यात १० प्रकारच्या व्यंजनांची मेजवानी मिळणार आहे.
दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या सारस पक्ष्यांची महाराष्ट्रात गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक संख्या आहे. मागील सात-आठ वर्षांपासून सेवा संस्था व पर्यावरण संवर्धन करणाऱ्या इतर संस्था सारस संवर्धनासाठी काम करीत आहेत. त्यामुळेच सारस पक्ष्यांची संख्या जिल्ह्यात ३९ वर पोहोचली असून, सारसांचा जिल्हा अशी ओळख जिल्ह्याला प्राप्त हाेत आहे. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात विदेशी पक्षी नवेगाव बांध व इतर जलाशयांवर दाखल होतात. यामुळेच दूरवरून पर्यटक गोंदिया येथे हजेरी लावतात. यामुळे अलीकडे पर्यटन व्यवसायाला सुद्धा चालना मिळू लागली आहे.
गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे उत्पादन घेतले जाते. धान हे पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. त्यामुळेच ३ हजार किमी अंतरावरील विदेशी पक्षी जिल्ह्यात हजेरी लावतात. यात प्रामुख्याने सायबेरिया, पूर्व चीन, युरोप, इंग्लड, बांगलादेश, लद्दाख, पूर्व आशिया या देशांतील पक्ष्यांचा समावेश आहे. नवेगाव बांध, झिलमिली, सलंगटोला, सोदलागोंदी या जलाशयांवर विदेशी पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळेच आता या पक्ष्यांचे आवडते खाद्य असलेल्या दहा प्रकारच्या गवताची लागवड करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने परसूड, हरक, कमल, शिमनी फूल, लेंडुरली, डेहंगो, दात्या, सावा, कईस, उरसड आदी गवतांचा समावेश आहे. गोंदिया वन विभागाने या जलाशयात गवताची लागवड करण्यास सुरुवात केली आहे.
नवेगाव बांध जलाशयातून आणले जातेय गवत
नवेगाव बांध जलाशयात जैविक खाद्य भरपूर असल्याने या परिसरात दरवर्षी विदेशी पक्ष्यांचे मोठ्या संख्येने आगमन होते. याच जलाशयातील गवत आणून जिल्ह्यातील विविध तलावांच्या परिसरात लागवड केली जात आहे. यामुळे पक्ष्यांच्या संवर्धनासह जैवविविधता वाढविण्यास सुद्धा मदत होणार आहे.
विदेशी पक्षी दरवर्षी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील जलाशयांवर हजेरी लावतात. ही संख्या वाढावी तसेच त्यांचे आवडते खाद्य त्यांना मिळावे यासाठी दहा प्रकारच्या गवताची जलाशयालगत लागवड केली जात आहे. या पक्ष्यांचे संवर्धन करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाणार आहे.
- मुकुंद धुर्वे, मानद वन्यजीव रक्षक, गोंदिया
.............