गोंदिया : हवामान खात्याने मंगळवारी (दि. २५) जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट व पावसाचा इशारा दिला होता. मात्र, शहरात ना गारपीट झाली ना पाऊस बरसला, उलट तळपत्या उन्हात दिवस गेला. मधामधात ढग दाटून येत होते मात्र पावसाने हजेरी लावली नसल्याने पारा चढून ३६.४ अंशावर आला होता.
हवामान खात्याने २० तारखेपासून जिल्ह्यात पावसाचा इशारा दिलेला आहे. त्यानुसार आता एप्रिल महिन्यातील उरलेले दिवस पावसाचेच दिसून येत आहेत. मात्र हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात कोठेच पाऊस बरसलेला नाही. त्यातही मंगळवारी काही ठिकाणी गारपिटीचा इशारा दिला होता. मात्र, सायंकाळपर्यंत कोठेही पाऊस बरसला किंवा गारपीटही झाली नाही. गोंदिया शहरात तर ऊन तापले होते व तशा वातावरणातच मंगळवारच दिवस गेला. ऊन तापल्यामुळे पारा चढला असून, ३६.४ अंश एवढी नोंद घेण्यात आली.
मंगळवारी अकोला तापला
- विदर्भात सर्वाधिक उष्ण चंद्रपूर जिल्ह्यात पडते व आतापर्यंत चंद्रपूर जिल्हाच सर्वात जास्त तापताना दिसला. मात्र, विदर्भात सध्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यात काही भागात पाऊस बरसत असून, ढगाळ वातावरणामुळे पारा घसरला आहे. हेच कारण आहे की, आतापर्यंत सर्वाधिक तप्त असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याचा पारा घसरला असून, मंगळवारी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. तर अकोला सर्वात जास्त तापला असून, ३९.८ अंश सेल्सिअस तापमान होते.