लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. १० ऑगस्टपर्यंत ३६१ कोरोना बाधितांची नोंद झाली होती. मंगळवारी (दि.११) यात पुन्हा ३६ कोरोना बाधितांची भर पडल्याने हा आकडा ३९७ वर पोहचला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात मंगळवारी आढळलेल्या ३६ कोरोना बाधितांमध्ये गोंदिया तालुक्यातील ८, देवरी तालुक्यातील ४, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ८, तिरोडा तालुक्यातील ७, आमगाव तालुक्यातील ८ आणि गोरेगाव तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. गोंदिया, आमगाव आणि तिरोडा तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने हे तिन्ही तालुके आता कोरोनाचा हॉटस्पॉट होत असल्याचे चित्र आहे. सोमवारी (दि.१०) तिरोडा तालुक्यातील पाटीलटोला येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोनाचा चवथा बळी गेला आहे.कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून दररोज सरासरी ५० नवीन रुग्णांची भर पडत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने संसर्ग वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना करण्याकरिता गावकऱ्यांनीच कंबर कसल्याचे चित्र आहे.आमगाव व सालेकसा येथे जनता कर्फ्यूआमगाव आणि सालेकसा तालुक्यातील मागील दोन दिवसात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी शहरवासीय आणि व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. बुधवारपासून (दि.१२) आमगाव येथे सात दिवस तर सालेकसा येथे सहा दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. या कालावधीत या दोन्ही शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद राहणार आहे.उपाययोजना राबविण्यात प्रशासन अपयशीजिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना त्यावर उपाययोजना करण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. क्वारंटाईन सेंटर आणि कोविड केअर सेंटरमधील अनागोंदी कारभाराच्या दररोज तक्रारी पुढे येत आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये योग्य सोयी सुविधा दिल्या जात नसल्याने अनेकजण बाहेरुन आल्यानंतर प्रशासनाला माहिती न देता थेट घरी जात आहेत. यातूनच जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे.नागरिकांनो वेळीच व्हा सावधमागील आठ दहा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे. अनावश्यक कामासाठी घराबाहेर पडू नये, नियमित मास्कचा वापर, दिवसभरातून वांरवार हात स्वच्छ धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच आपल्यासमोरील व्यक्ती ही कोरोना बाधित आहे असे समजून स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.