लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. मात्र, यंदाची विधानसभा निवडणूक ही वेगळी ठरण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पक्षांतराचे वारे वाहत असताना सर्वच राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी सुद्धा निवडणुकीच्या तोंडावर कुठलाही धोका पत्करणे टाळले असून शेवटच्या दिवशी ‘एबी’ फार्म देण्याचे नियोजन केले असल्याची माहिती आहे. त्यामुळे ऐन वेळेवर फोडाफोडीचे राजकारण सुरु होणार,अशी भिती सर्वच राजकीय पक्षांना सतावत आहे.विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारपासून (दि.२७) उमेदवारी अर्ज दाखल करण्य्स सुरुवात झाली. ४ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे राजकीय पक्षाच्या उमेदवारांकडून शेवटच्या दोन दिवसांतच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदारांनी पक्षातर केले असून ते ४ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यांच्या उमेदवारीनंतर जिल्ह्यातील राजकारणातील बरेच घोडे मागे पुढे होण्याची शक्यता आहे. अशात भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील आपले उमेदवार व विद्यमान आमदारांना पहिल्या यादीतच स्थान देऊन टाकले आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे पत्ते अद्याप उघडण्यात आलेले नाहीत. त्यामुळे उमेदवारीबाबतचा सस्पेन्स अधिक वाढला आहे.काँग्रेस-राका मधून जोरदार आऊट गोर्इंग सुरु असून निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण होवू नये, यासाठी सावध पवित्रा घेतला असल्याची माहिती आहे. तर भाजपमध्ये आयात केलेल्या इतर पक्षातील नेत्यांची गर्दी वाढली असल्याने या पक्षातील निष्ठावान कार्यकर्तेही दुखावले असून काही प्रमाणात असंतोष आहे. त्यामुळे या असंतोषाचे स्फोटात रुपांतर झाल्यास निवडणुकीत याचा फटका बसू शकतो. त्यामुळे सबुरीने घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशात उमेदवारीचे चित्र ३ तारखेलाच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची होणार दमछाकविधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून राज्यात एकाच दिवशी २१ तारखेलाच मतदान घेतले जाणार आहे. त्यामुळे आता प्रचाराला काही दिवसांचा अवधी मिळणार असल्याने स्टार प्रचारकांची चांगलीच दमछाक होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने यंदा प्रचारासाठी उमेदवारांना अत्यंत कमी कालावधी मिळणार आहे. २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ४ तारखेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्विकारले जाणार आहेत. ५ तारखेला नामनिर्देशनपत्राची छाननी व ७ तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. २१ तारखेला मतदान व २४ तारखेला मत मोजणी होणार आहे. यामुळे ८ तारखेपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार आहे. प्रचारासाठी उमेदवारांना केवळ १२ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. अवघ्या १२ दिवसांत उमेदवारांना अवघा मतदारसंघ पिंजून काढावा लागणार आहे. निवडणूक कालावधीत भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित आघाडी, मनसे आदी पक्षांचे अनेक स्टार प्रचारक प्रचार करताना दिसणार आहेत.
Vidhan Sabha Election 2019; गोंदिया जिल्ह्यात उमेदवारांच्या दलबदलाने राजकारण तापणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 11:57 AM