गोंदिया : कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यात जिल्ह्याला यश आले आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.४३ एवढा आहे. त्यामुळे कोरोनाच्या लढ्यात गोंदिया जिल्ह्याचा आदर्श ठेवून सर्व जिल्ह्यांनी काम करावे असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात मंगळवारी (दि.१५) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना ना. सामंत यांनी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्यंत सक्षमपणे कामगिरी बजावली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यातील व्यवसाय, उद्योगांसह इतर महत्वाच्या आस्थापना व घटक पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. प्रशासनामधील आरोग्य, पोलीस, महसूल व इतर सर्व संबंधीत विभागांनी समन्वय ठेवून उत्कृष्ट कार्य केल्याने गोंदिया जिल्हा राज्यापुढे आदर्श ठरलेला आहे, असे त्यांनी सांगितले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने गोंदिया जिल्ह्याला ४ व्हेंटीलेटर संयंत्र देण्यात आले आहेत. त्यामुळे कोविडच्या रुग्णांना उपचारासाठी व संभाव्य तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी ते व्हेंटीलेटर महत्वाचे ठरणार आहे. तर उच्च व तंत्रशिक्षण विभागात प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याबाबत वरिष्ठ स्तरावर कार्यवाही सुरु आहे. पुढील काही दिवसात मान्यता प्राप्त करुन रितसर पदभरती लवकरच पूर्ण करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या हस्ते कोरोना योध्दयांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसीलदार आदेश डफळ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नरेश तिरपुडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे उपस्थित होते.