गोंदिया : प्लास्टिक बंदीला घेऊन नगर परिषदेने सुरू केलेल्या धाडसत्रांतर्गत बुधवारी 14 सप्टेंबर रोजी नगर परिषदेच्या पथकाने शहरातील तीन घाऊक प्लास्टिक व्यापाऱ्यांना दणका दिला. पथकाने त्यांना १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला असून त्यांच्याकडील प्लास्टिक साहित्य जप्त केले आहे. राज्य शासनाने प्लास्टिक पिशव्या आणि अन्य साहित्यांवर बंदी घातली आहे. त्याअंतर्गत नगर परिषदेने मंगळवारपासून धाडसत्र सुरू केले आहे. यामध्ये मंगळवारी नगर परिषदेने तब्बल १२ दुकानांवर धाड घालत तेथील प्लास्टिक साहित्य जप्त केले. तसेच प्रत्येकी ५ हजार रुपयेप्रमाणे ६० हजार रुपयांचा दंड दुकानदारांना ठोठावला होता. एवढेच नव्हे तर बुधवारी या पथकाने परत शहरात धाडसत्र राबविले व याअंतर्गत त्यांनी शहरातील घाऊक प्लास्टिक व्यापाऱ्यांना दणका दिला.
दरम्यान, बुधवारी पथकाने शहरातील प्लास्टिक व्यापारी अग्रवाल प्लास्टिक, असाटी प्लास्टिक तसेच साई भगत सेल्स या दुकानांवर धाड घातली. यामध्ये पथकाने तिघांना प्रत्येकी ५ हजार रुपयेप्रमाणे एकूण १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच दुकानांमध्ये बंदी असलेले प्लास्टिक साहित्य जप्त केले. ही कारवाई उपमुख्याधिकारी विशाल बनकर, लेखाधिकारी अभिजीत फोफाटे, कार्यालय अधीक्षक मनीषा पारधी, आंतरिक लेखा परीक्षक महेश खरोडे, अभियंता विवेक सरपे, आरोग्य निरीक्षक गणेश हतकय्या, मुकेश शेंद्रे, मनीष बैरिसाल, प्रफुल पानतवने, प्रतीक मानकर, सुमित शेंद्रे, सुरेश खांडेकर, गणेश भेलावे, भावेश चौधरी, रितेश बैरिसाल, मीना वासनिक, माधुरी खोब्रागडे यांनी पार पाडली.
नागरिकांवरही होणार कारवाईशासनाने प्लास्टिक बंदी केली असून, त्यानुसार नगर परिषदेने बंदी असलेले प्लास्टिक साहित्य विक्री करणाऱ्या व वापरणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. मात्र, प्लास्टीक बंदी अंतर्गत नागरिकांनाही बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या व अन्य साहित्याचा वापर करण्यावर बंदी आहे. यामुळे बंदी असलेल्या प्लास्टिक साहित्याचा वापर करणाऱ्या नागरिकांवरही नगर परिषदेकडून कारवाई केली जाणार आहे