कपिल केकत ,गोंदिया : जिल्ह्यात थंडीचा जोर काही कमी होताना दिसत नसून, उलट गुरुवारी (दि. २१) पारा आणखी घसरला असून किमान तापमान ९ अंशांवर आले होते. विशेष म्हणजे, १० डिसेंबरपासून मधातील एक-दोन वगळले असता गोंदिया जिल्हा विदर्भात पहिल्या क्रमांकावर आहे, तर मंगळवारपासून (दि. १९) जिल्ह्याचा पारा ९ अंशांवर स्थिर झाला आहे. सर्वांत कमी तापमानाची नोंद असल्यामुळे गोंदिया जिल्हाच ‘थंडा-थंडा, कुल-कुल’ ठरला आहे.
नोव्हेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर खऱ्या अर्थाने थंडीचा जोर वाढून हिवाळ्याला सुरुवात झाल्याचा अनुभव आला, तर डिसेंबर महिन्याची सुरुवातच अवकाळी पावसाने झाली व जिल्हा थंडगार झाला. आता पावसाने पाय काढला असतानाही गार वारे वाहू लागले असून, मधातच ढग दाटून येत आहेत. परिणामी थंडीचा जोर काही कमी होताना दिसत नसून, उलट पारा घसरत चालला आहे. मंगळवारी (दि. १९) जिल्ह्याचे किमान तापमान ९ अंशांवर आले होते व यंदाच्या सर्वांत कमी तापमानाची नोंद घेण्यात आली. बुधवारी (दि. २०) तापमान ९.२ अंशांवर पोहोचले होते, मात्र गुरूवारी (दि. २१) परत पारा घसरला व तापमान ९ अंशांवर आले. यामुळे गोंदिया जिल्हा विदर्भात पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
१० तारखेपासून सर्वांत कमी तापमान :
डिसेंबर महिना हिवाळा घेऊन आला असून, गोंदिया जिल्हाच विदर्भात सर्वांत कमी तापमान म्हणून नोंद घेत आहे. १० डिसेंबर रोजी जिल्ह्याचे किमान तापमान १२.६ अंशांवर होते. त्यानंतर ११, १२, १३ व १४ तारखेला तापमान १३ अंशांच्या घरात गेले. मात्र, त्यानंतर १५ तारखेपासून पारा घसरला असून, १८ तारखेपर्यंत पारा १२ अंशांच्या घरातच होता. १९ तारखेला मात्र सर्वांत कमी ९ अंशांची नोंद घेण्यात आली असून, तेथेच पारा स्थिरावला आहे.
प्रथम पाच शहरांचे किमान तापमान :
शहर- किमान तापमान (अंश सेल्सिअस)
गोंदिया व गडचिरोली - ९.०चंद्रपूर- ९.२
यवतमाळ- ९.५नागपूर- १०.६
वाशिम- १०.८तारीखनिहाय तापमानाची स्थिती :
तारीख- किमान तापमन (अंश सेल्सीअस) -
१० डिसेंबर - १२.६
११ डिसेंबर- १३.०
१२ डिसेंबर- १३.२
१४ डिसेंबर- १३.२
१५ डिसेंबर -१२.२
१६ डिसेंबर - १२.४
१७ डिसेंबर - १२.८
१८ डिसेंबर - १२.५
१९ डिसेंबर -९.०
२० डिसेंबर- ९.२
२१ डिसेंबर- ९.०