- नरेश रहिलेगोंदिया - शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गजानन मंदिर जवळ मामा चौक गोंदिया व छोटा गोंदियाच्या संजयनगर येथे दोन ठिकाणी चार कंपन्यांच्या नकली बिडी तयार करून बाजारात विक्री करणाऱ्या दोघांवर गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींजवळून ३ लाख ५४ हजार ६९७ रूपयाची नकली बिडी जप्त करण्यात आली. ही कारवाई १७ ऑगस्टच्या सायंकाळी ६:३० वाजता करण्यात आली. यासंदर्भात १८ ऑगस्टच्या पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंदियातील गजानन मंदिराजवळ राहणारा आरोपी रमेश वासुदेव गुप्ता (५५) व हलवाई असोशिएशन जवळ राहणारा आशीफ अहमद कच्ची (५५) या दोघांनी साबळे वाघीरे ॲण्ड कंपनी लिमीटेड (साबळे/राजकलमल बिडी), देसाई ब्रदर्स लिमीटेड देसाई बिडी, भारत बिडी वर्क प्रा.लिमीटेड, जसवंतभाई ॲण्ड कंपनी या चार कंपनीची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बनावट बिड्या, रॅपर, लेबल व टिकली जवळ घेऊन बसलेल्या त्या दोघांच्या कारखान्यावर धाड टाकण्यात आली. यात ३ लाख ५ध हजार ६९७ रूपयाची नकली बिडी आरोपींनी विक्री करीता तयार करून ठेवली हाेती. या कंपन्यांचे वरिष्ठ तपास अधिकारी अनुप संभाजी कोलप (४०) यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी कॉपी राईट कलम ५१, ६३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक फौजदार मिताराम गणवीर करीत आहेत.