- अंकुश गुंडावार
गोंदिया - विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भजेपार येथील जिल्हा परीषद शाळेच्या जणू भिंतीही बोलू लागल्या आहेत. येथील माजी विद्यार्थ्यांनी चक्क लोक वर्गणीतून 1 लाख 23 हजार रुपयांची आकर्षक पेंटिंग व दुरुस्ती करून शाळा बोलकी केली आहे. यासाठी पुढाकर घेणाऱ्या शाळा व्यवस्थापन समितीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा भजेपार येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष टेकराम बहेकार यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे क्रियाशील सदस्य रेवतकुमार मेंढे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्णत्वास आला आहे. लोकवर्गणीसाठी कुठेही न जाता फक्त व्हॉट्स ॲप वर शाळेच्या अस्तित्वाला वाचविण्याचे आणि शाळेचा कायापालट करण्यासाठी आर्थिक मदतीचे भावनिक आवाहन करण्यात आले. या आवाहनाला शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आणि गावकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद देत लाख रुपयांची रक्कम अवघ्या काही दिवसातच उभी केली आणि बघता बघता शाळेचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलायला सुरुवात झाली. 1.23 लाख रुपयांच्या निधीतून शाळेच्या डेस्क बेंच ची दुरुस्ती, आकर्षक पेंटिंग आणि ईतर भौतिक सुविधेची कामे करण्यात आली असून विद्यार्थ्यासाठी हे खुप आनंददायी ठरले आहे. या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष प्रतिमाबाई बहेकार, सदस्य नरेश फुन्ने, चंद्रकुमार पाथोडे, भूमेश्वर मेंढे, नंदकुमार ब्राह्मणकर, संजय चुटे, शोभाबाई बहेकार, चुन्नेश्वरीबाई चुटे, इंद्रकलाबाई शिवणकर, लताबाई कलचार यांच्यासह गावातील होतकरू तरुण आणि संपूर्ण ग्राम वासियांनी परिश्रम घेतले. समितीने घेतलेल्या सुखद प्रयत्नांबद्दल मुख्याध्यापक सौ. एम एम देवरे, केंद्रप्रमुख डी. व्ही. भूते, सहाय्यक शिक्षक जी.एन. तुरकर, एन जी घासले, आर एम भोयर, व्ही.एस मेश्राम, अरुण कोटेवार यांनी समितीचे आभार मानले असून गुणवत्ता वाढीसाठी सर्वकष प्रयत्न करण्याची हमी दिली आहे.
नवोदय चे निःशुल्क क्लासस्थानिक ग्राम पंचायतीचे सरपंच चंद्रकुमार बहेकार, उपसरपंच कुंदा ब्राह्मणकर, सदस्य रविशंकर बहेकार, रेवतचंद बहेकार, राजेश बहेकार, ममता शिवणकर, सरस्वता भलावी, मनिषा चुटे, आत्माराम मेंढे, आशा शेंडे यांच्या पुढाकारातून गुणवत्ता वाढीसाठी नवोदय आणि स्कॉलरशीपचे निःशुल्क क्लास सुरू करण्यात आले.अध्यापनासाठी मुकेश पाथोडे, कमलेश मेंढे यांचे मोलाचे सहकार्य लाभले हे विशेष!
505 साहित्यासह सुसज्ज लॅबडॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सायन्स टेक्नॉलॉजी व इनोव्हेशन सेंटर मुंबई तर्फे एकूण 505 साहित्याच्या माध्यमातून सुसज्ज सायन्स लॅबोरेटरी तयार करण्यात आली असून यासाठी पुणे येथील युरोकोर्न कंपनीचे सहकार्य लाभले असल्याचे बोलले जात आहे.