बोंडगावदेवी : कपडा व्यावसायिकांनं स्वत:च्या घरी कुणीही नसताना सिलिंग फॅनला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बोंडगादेवी येथे शुक्रवारी (दि.२९) दुपारी वाजता उघडकीस आली. हरिश्चंद्र गंगाराम निमजे (६०वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या कपडा व्यावसायिकाचे नाव आहे.
अर्जुनी-मोरगाव ते सानगडी मार्गावरील निमजे कापड दुकान व्यावसायीक हरिश्चंद्र निमजे कुटुंबासह एकत्र राहत होते. निमजे यांनी कापड व्यवसायात मागील काही वर्षापासून चांगलाच जम बसविला होता. हरिश्चंद्र निमजे हे पत्नी व उच्चशिक्षीत मुलासह दुकानाच्या बाजूला असलेल्या घरी राहत होते. सर्व काही सुरळीत होते. घटनेच्या दोन दिवसांपूर्वी पत्नी व मुलगा पवनी येथील नातलगाच्या घरी गेले होते. त्यामुळे हरिश्चंद्र निमजे हे दोन दिवसांपासून घरी एकटेच होते.
शुक्रवारी सकाळी हरिश्चंद्र निमजे यांनी आंघोळ करुन पूजा केल्याचे बोलले जाते. शुक्रवारी दुपारी त्यांचे दुकान बंद दिसल्याने संशय बळावला. कापड खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकाने आवाज मारला परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आतमधून दार बंद असल्याचे दिसले. त्यामुळे त्याने त्यांच्या घराच्या खिडकीतून आता डोकावून पाहिले असता हरिश्चंद्र निमजे गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले. दरम्यान गावकऱ्यांनी या घटनेची माहिती अर्जुनी मोरगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केली. निमजे यांनी कुठल्या कारणावरुन आत्महत्या केली याचे गुढ कायम आहे.