गोंदिया : तालुक्यातील बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला १ डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. इंडिगो कंपनीने या विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, गोंदिया-हैदराबाद-तिरुपती प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ होणार आहे. ही विमान वाहतूक सुरू झाल्याने जिल्हावासीयांना दिवाळीची भेट मिळाली असून, प्रवाशांमध्येसुद्धा आनंदाचे वातावरण आहे.
इंडिगो विमान कंपनीने १ डिसेंबरपासून बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवेला प्रारंभ करीत असल्याचे जाहीर करीत त्याचे वेळापत्रकसुद्धा जाहीर केले आहे. गोंदिया-हैदराबाद, गोंदिया-तिरुपतीदरम्यान सेवा सुरू केली जाणार आहे. या दोन्ही ठिकाणी दररोज विमानसेवा असणार आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांतील भाविकांना तिरुपती येथे दर्शनासाठी जाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
विमान क्रमांक ६ ई ७५३४ हा तिरुपतीवरून सकाळी ८:४० वाजता उड्डाण घेईल. तर हैदराबाद येथे सकाळी ९:५० वाजता पोहोचेल, त्यानंतर हैदराबादवरून सकाळी १०:२० वाजता गोंदियासाठी उड्डाण भरेल व गोंदियाला दुपारी १२:३५ वाजता पोहोचेल. तर गोंदिया विमानतळावरून विमान क्रमांक ६ ई ७२६३ हा दुपारी १२:५५ वाजता हैदराबादसाठी उड्डाण भरेल. हैदराबाद येथे दुपारी २:५५ वाजता पोहोचेल. त्यानंतर हेच विमान दुपारी ३:२५ वाजता तिरुपतीसाठी उड्डाण घेईल आणि सायंकाळी ४:५० वाजता तिरुपतीला पोहोचेल. इंडिगो विमान कंपनीने हे वेळापत्रक जाहीर करीत त्यासाठी तिकीट बुकिंगला सुद्धा सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी निश्चितच आनंदाची बाब आहे.
तब्बल वर्षभरानंतर प्रवासी विमानसेवेचा टेकऑफ
मागील वर्षी १३ मार्चपासून बिरसी विमानतळावरून नोएडा येथील फ्लाय बिग या विमान कंपनीने इंदौर-गोंदिया-हैदराबाद या प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ केला होता. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसादसुद्धा मिळत होता; पण या कंपनीने सहा महिन्यांतच सेवा बंद केली होती. दरम्यान, आता तब्बल वर्षभरानंतर इंडिगो कंपनीने या विमानतळावरून प्रवासी सेवेचा टेकऑफ करण्याचा निर्णय घेतला आहे. १ डिसेंबरपासून गोंदिया-हैदराबाद-तिरुपती या विमानसेवेला प्रारंभ होत आहे.
पुढील टप्प्यात मुंबई-पुणे-छत्रपती संभाजीनगर
इंडिगो कंपनीने तूर्तास गोंदिया-हैदराबाद-तिरुपती या मार्गावर प्रवासी विमान सेवेचा प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर लवकरच बिरसी विमानतळावरून मुंबई-पुणे-छत्रपती संभाजीनगर या मार्गावरसुद्धा या सेवेला प्रारंभ करण्याचे संकेत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.
बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला सुरुवात व्हावी, यासाठी इंडिगो विमान कंपनीशी चर्चा केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सेवा करून करण्याची ग्वाही दिली होती. त्यातच १ डिसेंबरपासून आता सेवेला प्रत्यक्षात प्रारंभ होत असून, ही जिल्हावासीयांसाठी आनंदाची बाब आहे.
-प्रफुल्ल पटेल, खासदार
बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ होत असल्याने ही जिल्ह्याच्या विकासासाठी गौरवाची बाब आहे. यामुळे व्यापाराला चालना मिळून रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास निश्चित मदत होईल.
- विनोद अग्रवाल, आमदार गोंदिया