गोंदिया : एकीकडे पाऊस काही बरसत नसून दुसरीकडे सूर्यदेव आग ओकत असल्याने जिल्हावासी या वातावरणात भाजून निघत आहेत. शुक्रवारी जिल्ह्याचे तापमान ३४.६ अंशावर होते व जिल्हा विदर्भात तिसऱ्या क्रमांकावर होता. या वातावरणामुळे सध्या पावसाळा सुरू आहे की उन्हाळा हे समजेनासे झाले आहे.
मागील पंधरवड्यापासून पावसाने दडी मारली आहे. पावसाची अत्याधिक गरज असतानाच पाऊस डोळे वटारत असल्यामुळे जिल्हावासीयांची पार फसगत होत आहे. पाऊस नसल्याने एकीकडे शेतकऱ्यांची फसगत होत असून, पिकांना धोका निर्माण झाला आहे तर दुसरीकडे उन्ह तापत असून, उकाडा वाढल्यामुळे बदलत्या वातावरणाचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर बसत आहे. उन्ह तापत असल्यामुळे जिल्हावासी घामाघूम होत असून, शुक्रवारी (दि. १) जिल्ह्याचे कमाल तापमान ३४.६ अंशावर होते व जिल्हा विदर्भात तिसऱ्या क्रमांकावर होता.
जिल्ह्यात सर्वत्र तापाची साथ‘कधी धूप, तो कभी छाव’ अशी स्थिती जिल्ह्याची झाली आहे. कधी चांगले उन्ह तापत असून, मधेच ढग दाटून येतात व आता पाऊस बरसणार असे वाटते. मात्र काही वेळातच वातावरण बदलताना दिसत आहे. या वातावरणाचा परिणाम मात्र नागरिकांच्या आरोग्यावर पडत आहे. यातूनच सध्या तापाची साथ सुरू आहे. लहान व वृद्धच काय तर मोठेही या साथीच्या कचाट्यात येत आहेत. घराघरांत तापाचे रुग्ण असून, दवाखान्यांमध्ये गर्दी वाढली आहे.
विदर्भातील तापलेली प्रथम पाच शहरे
शहरे- तापमान
- अकोला - ३५.०
- ब्रह्मपुरी- ३४.८
- गोंदिया- ३४.६
- यवतमाळ-३४.५
- अमरावती व चंद्रपूर- ३४.२