कपिल केकत, गोंदिया : मागील चार-पाच दिवसांपासून थंडीने गोंदिया जिल्ह्यात मुक्काम ठोकला असून यामुळेच जिल्हा विदर्भात सर्वात थंड दिसून येत आहे. गुरुवारीही (दि.१४) जिल्ह्याचे कमाल तापमान २७.२ अंश तर किमान तापमान १३.२ अंशांवर आले होते. यानंतर जिल्हा परत एकदा विदर्भात प्रथम क्रमांकावर होता. थंडीचा चांगलाच जोर असल्यामुळे जिल्हावासीय हिवाळ्याचा आनंद लुटताना दिसत आहेत.
अवकाळी पावसाने ७ डिसेंबरपासून जिल्ह्यातून पाय काढला व त्यानंतर थंडीचा जोर वाढत चालला आहे. तेव्हापासून जिल्ह्याचे तापमान व विदर्भात सर्वात कमी नोंदले जात आहे. गुरुवारीसुद्धा (दि.१४) जिल्ह्याचे तापमान विदर्भात सर्वात कमी होते. जिल्ह्याचे कमाल तापमान २७.२ अंशांवर तर किमान तापमान १३.२ अंशांवर आल्याने सकाळी व सायंकाळ होताच थंडीचा जोर वाढू लागत आहे. यामुळे जिल्हावासीय गरम कपडे घालून वावरत असून थंडीची मजा घेत आहेत.
ढगाळ वातावरणाने भरती धडकी
७ डिसेंबरपासून अवकाळी पावसाने जिल्हा सोडला आहे. मात्र, त्यानंतर मधामधात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. कधी-कधी तर दिवसभर ढग दाटून येत असल्याने पाऊस तर धडकणार नाही ना अशी भीती वाटते. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान केले आहे. त्यात आता ढग दाटून आल्यास धडकीच भरत आहे.