गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभुमीवर बोगस बि-बियाणे, खते व किटकनाशकाच्या विक्रोस आळा घालण्यासाठी कृषि विभागाने ९ भरारी पथक स्थापन केली आहेत. भरारी पथकामार्फत अचानक तपासणीसाठी धडक मोहिम जिल्ह्यात राबविली जात आहे. जून महिन्यात कृषि केंद्राच्या तपासणीवेळी विक्री परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्राचा समावेश नसणे, नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदतीत नुतनीकरण न करणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, साठा व विक्री रजिस्टर न ठेवणे, रजिस्टर वरील साठा व प्रत्यक्ष साठा न जुळणे, मुदतबाह्य किटकनाशक साठा विक्रीसाठी ठेवणे आदी कारणामुळे ४३ निविष्ठाधारकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. त्यामध्ये गोंदिया -०७, सडक अर्जुनी - २०, अर्जुनी/मोर - ११, सालेकसा -०३, गोरेगाव ०२ असे बियाणे-३, रासायनिक खते-३६, किटकनाशक- ०४ एकुण ४३ कृषि निविष्ठा परवाने समावेश असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री हिंदुराव चव्हाण यांनी दिली.
कृषि सेवा केंद्र चालकांनी बियाणे, रासायनिक खतांची साठेबाजी केली अथवा जादा दराने खत विक्री केल्यास कायद्यांतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. शेतकन्यांनी अधिकृत परवानाधारक कृषि सेवा केंद्राकडुन खते, बियाणे व किटकनाशकाची खरेदी करावी. खरेदी करतांना कृषि निविष्ठा केंद्राकडुन निविष्ठा खरेदीची पक्के बिले घ्यावे. त्यावरील नमुद एमआरपी प्रमाणे मालाची खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे, तसेच एमआरपी पेक्षा जादा दराने मालाची विक्री होत असल्यास कृषि विभागाकडे तक्रार करावी. तक्रारीची तात्काळ दखल घेऊन बियाणे कायदा १९६६, बियाणे नियम १९६८, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, खत नियंत्रण आदेश १९८५. अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५, कीटकनाशक कायदा १९६८. कीटकनाशक नियम १९७१ नुसार कार्यवाही संबंधितावर करण्यात येईल.
सदर कार्यवाही मा.राजेंद्र साबळे विभागीय कृषी सहसंचालक नागपूर विभाग नागपूर व श्री हिंदुराव चौहान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.