वर्षातील सर्वात तापणारे दिवस म्हणून नवतपा ओळखला जातो. मे महिन्यात शेवटच्या आठवड्यात नवतपाला सुरूवात होत असून जून महिन्यातील पहिल्या आठवड्यापर्यंत हा नवतपा जातो. या ९ दिवसांचा कालावधी चांगलाच तापत असल्याने यालाच नवतपा म्हटले जाते. मात्र यंदा मे महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने व त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे मे महिना जसा तापावा तसा तापलाच नाही आतापर्यंत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आतच नोंदल्या गेले आहे.
मात्र नवतपा आता जिल्ह्याला तापवत असल्याचे दिसत असून गुरूवारी (दि. २७) जिल्ह्याचे तापमान थेट ४२ अंश सेल्सिअसवर पोहचल्याचे दिसले. विशेष म्हणजे, आतापर्यंत असलेले ढगाळ वातावरण व पाऊस आता बेपत्ता झाला आहे. यामुळे चांगलाच उकाडा वाढला असून आता घराबाहेर पडणे कठीण होत आहे. नवतपाची आता जेमतेम सुरूवात असल्याने पुढील दिवस असेच तापणार की वरूणराजा दिलासा देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
----------------------------
सर्वांच्या नजरा पावसाकडे
कडक उन्ह व उकाड्यामुळे आता नागरिकांना उन्हाळा असह्य होताना दिसत आहे. मे महिन्यात पावसाने हजेरी लावून दिलासा दिल्याने नागरिकांना कडक उन्हापासून सुटका हवी आहे. गुरूवारी व शुक्रवारी जिल्ह्याचे तापमान थेट ४२ अंश सेल्सिअसवर गेल्याने नागरिकांना धडकी भरली आहे. अशात आता पावसाने हजेरी लावून यापासून सुटका करावी यासाठी सर्वांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत.