गोंदिया : नागालँड बार्डवर मंगळवारी (दि.२५) सकाळी झालेल्या चकमकी दरम्यान गोळी लागून गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडी येथील सीआरपीएफचे जवान प्रमोद कापगते हे शहीद झाले. त्यांचा मृतदेह गुरुवारी त्यांच्या मुळगावी परसोडी येथे आणण्यात येणार असून तेथेच त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
प्राप्त माहितीनुसार प्रमोद कापगते हे मुळचे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडी येथील रहिवासी होत. त्यांचे कुटुंबीय सुध्दा सद्या परसोडी येथेच वास्तव्यास आहेत. भाजपचे जेष्ठ नेते विनायक कापगते यांचे ते सुपत्र होत. प्रमोद कापगते हे बीए अंतीम वर्षाला असताना सन २००१ मध्ये सीआरपीएफमध्ये भरती झाले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण परसोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण सडक अर्जुनी येथील राजीव गांधी महाविद्यालयात पूर्ण झाले. मागील २० वर्षापासून ते सीआरपीएफमध्ये कार्यरत होते.
सीआरपीएफमधील त्यांचा २० वर्षांचा बॉंड सुध्दा पंधरा दिवसांनी पूर्ण होणार होता. मात्र मंगळवारी नागालॅंड बार्डवर झालेल्या चकमकी दरम्यान त्यांचा गोळी लागून मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर सुध्दा मोठा आघात झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी वंदना कापगते, मुलगा कुणाला कापगते, भाऊ राजेश कापगते व बराच मोठा आप्त परिवार आहे. शहीद प्रमोद कापगते यांचा मृतदेह २७ मे रोजी सकाळी सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडी येथे पोहचणार असून त्यांच्या मुळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.