नरेश रहिले
गोंदिया : जिल्हा परिषद शाळांमधील भौतिक सुविधेपासून विद्यार्थ्यांची गुणवत्ता व विद्यार्थ्यांची सुरक्षितता अशा विविध पैलूंचे मूल्यांकन करून केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्वेक्षण केले. परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स (२०१९-२०) जाहीर केले. यात गोंदिया जिल्हा महाराष्ट्रात पाचव्या क्रमांकावर आहे.
केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ७ जून रोजी परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स (२०१९-२०) जाहीर केले. यात गोंदिया जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे. बृहन् मुंबई बीएमसी पहिल्या क्रमांकावर, सातारा दुसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर नाशिक, चवथ्या क्रमांकावर चंद्रपूर तर पाचव्या क्रमांकावर गोंदिया आहे. नॅशचे सर्वेक्षण, सगून पोर्टल, युडायस, शाळा सिद्धी, मिड डे मिल, भौतिक सुविधा, शासकीय योजनांची कार्यवाही, शाळांची सुरक्षितता व विद्यार्थ्यांचे संरक्षण या सर्व बाबींचे मूल्यांकन करून केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय नवी दिल्लीच्या मानांकनानुसार परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स (२०१९-२०) प्रसिद्ध करण्यात आले. यात गोंदिया - महाराष्ट्र पहिल्या पाचमध्ये आहे. बालकांच्या गुणवत्तेत गोंदियाने २९० गुणांपैकी १८७ गुण घेतले आहेत. एका वर्गातून पुढच्या वर्गात जाणाऱ्यांसाठी ९० गुणांपैकी ७८.५५ टक्के, शाळेतील भौतिक सुविधा ५१ गुणांपैकी ४२.४५, शाळा सुरक्षा व बालकांचे संरक्षण ३५ गुणांपैकी २९.९९, शाळांत डिजिटल लर्निंगच्या काय सुविधा आहेत. मॉनिटरिंग सिस्टम अशा विविध पैलूंचे मूल्यांकन करून गोंदिया जिल्ह्याला ६०० पैकी ४१४.६६ गुण मिळाल्याने गोंदिया महाराष्ट्रात अवघ्या पाचमध्ये आला आहे.
कोट
मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मानांकनात गोंदिया जिल्ह्याला पुढे आणण्यासाठी आम्ही जुलै २०१९ पासून नियोजनबद्ध कामाची सुरुवात केली. त्याचे प्रतिबिंब म्हणून आपण राज्यात पहिल्या पाचमध्ये आलो आहोत. याचे श्रेय सर्व शिक्षक यंत्रणेला जाते.
राजकुमार हिवारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, गोंदिया.