गोंदिया : शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी पालकाच्या तक्रारीनंतर शाळेने शिक्षकावर निलंबनाची कारवाई केली, तर या प्रकरणी शिक्षकावर फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी (दि.१३) करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, गोंदिया तालुक्यातील चुलोद येथील प्रोगेसिव्ह इंटरनॅशनला शाळेतील एका शिक्षकाने शारीरिक सरावादरम्यान सहाव्या वर्गात शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांला बेशुद्ध होईपर्यंत काठी आणि पाइपने बेदम मारहाण केली. ही घटना ३० ऑगस्टला घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या पालकांनी रोष व्यक्ती व्यक्त करीत, शिक्षकासह शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी आदिवासी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्याकडे केलेल्या तक्रारीतून केली.
विद्यार्थ्याच्या पालकाने गोंदिया ग्रामीण पोलिसातही तक्रार केली आहे. आरटीईअंतर्गत देवरी तालुक्यातील मुरपार येथील सौरभ रामेश्वर उईके हा विद्यार्थी चुलोद येथील प्रोगेसिव्ह इंटरनॅशनल शाळेत शिकत असून, शाळेत शारीरिक सराव सुरू असताना क्षुल्लक कारणावरून शिक्षकाने सौरभ या विद्यार्थ्याला काठी आणि प्लास्टीकच्या पाईपने मारहाण केल्याने विद्यार्थी बेशुद्ध पडल्याची माहिती विद्यार्थ्याच्या वडिलांना होताच, त्यांनी शाळेत धाव घेत, सौरभला गावी घेऊन आले. त्यानंतर, औषधोपचार करून विचारपूस केली असता, सौरभने मारहाण केल्याचे घरच्यांना सांगितले.
त्यानंतर, पालक रामेश्वर उईके यांनी देवरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांची भेट घेत, या प्रकरणाची लेखी तक्रार केली. त्यानंतरही कारवाई न झाल्याने सदर पालकाने गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणे गाठत शिक्षक व शाळा व्यवस्थापनाविरुद्ध पोलिसात तक्रार केली होती. या मारहाण प्रकरणामुळे शिक्षकांच्या भीतीने सौरभ खूप घाबरला असल्याने, तो आता शाळेत जाणार नसल्याचे सांगत आहे.
दरम्यान, या प्रकरणी शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकावर मंगळवारी (दि.१३) निलंबनाची कारवाई केली, तसेच पालकाच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात तक्रार नोंदविण्यात आली असल्याचे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
या प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्या चौकशी समितीच्या तपासणीत या शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे दोषी शिक्षकावर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश शाळा व्यवस्थापनाला देण्यात आले होते. त्यानुसार, शाळा व्यवस्थापनाने शिक्षकाला निलबिंत केले आहे.
- विकास राचेलवार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी देवरी.
मुख्याध्यापकांकडे तक्रार करण्यास गेलेल्या विद्यार्थ्याला मारहाण
वर्गातील चाचणी परीक्षेदरम्यान शिकविण्यात न आलेल्या भागाचेही प्रश्न विचारले गेल्याने, मुख्याध्यापकांकडे तक्रार करण्यास गेलेल्या यश शरणागत या ९ व्या वर्गाच्या विद्यार्थ्याला वर्गखोलीत शिक्षकाने मारहाण केल्याची घटना गोरेगाव येथील शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद कनिष्ट महाविद्यालयात दोन दिवसांपूर्वी घडली. या मारहाण प्रकरणात शिक्षकाने विद्यार्थ्याच्या पालकाला माफीनामा लिहून दिल्याने हे प्रकरण शांत झाले.