गोंदिया - जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. तालुक्यातील शिवणी रोडवरील नाल्याला पूर आला असून पुलावरून पाणी वाहत आहे. या पुलावरून पाणी वाहत असताना सुमो गाडी पार करताना ती पुरात वाहून गेल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.१०) रात्रीला ९ वाजताच्या सुमारास घडली. यात एक जण वाहून गेला असून दोन जण बचावले आहेत. घटनास्थळी बचाव पथक व पोलीस यंत्रणा पोहचली असून वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध सुरु आहे.
प्राप्त माहितीनुसार आमगाव तालुक्यातील तीन जण शिवणी येथे तेरवीचे कार्यक्रम असल्याने सुमोने आमगाववरून शिवणी गावाकडे येते होते. दरम्यान शिवणी गावाजवळील नाल्याला पूर आला असून पुलावरून पाणी वाहत असताना पूल पार करीत असताना सुमो नाल्यात वाहून गेली. सुमोतील तीन पैकी दोन जण कसेबसे बाहेर आले. परंतु एक व्यक्ती सुमोसोबत नाल्यात वाहून गेला. बचावलेल्या व्यक्तीनी याची माहिती त्वरित आमगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस व बचाव पथक घटना स्थळी पोहोचले. बातमी लिहेपर्यंत वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध सुरू होता.