गोंदिया : जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक ७९६४ रुग्ण गोंदिया तालुक्यात आढळले आहेत. त्यातच मागील तीन-चार दिवसांपासून गोंदिया तालुक्यात दररोज आठ-दहा रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे या तालुक्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ६० वर पोहचली आहे. बांधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने गोंदिया तालुका कोरोनाचा हॉटस्पाॅट होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गोंदिया शहर आणि तालुकावासीयांना अधिक काळजी घेऊन कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.
विदर्भातील काही जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू न देता जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी कोराेना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. मास्क, सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. तरच जिल्ह्याला कोरोनामुक्त ठेवण्यास मदत होईल आणि लॉकडाऊन टाळता येईल. बुधवारी (दि.२४) जिल्ह्यात १० बाधितांची नोंद झाली तर ८ बाधितांनी कोरोनावर मात केली. बुधवारी सर्वाधिक ८ रुग्ण गोंदिया तालुक्यात तर २ रुग्ण अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आहेत. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ६९४१५ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ५७६५८ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत ६८०७८ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ६१८९५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४३६५ कोरोना बाधित आढळले असून यापैकी १४१०३ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ७७ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ४५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
......
रुग्ण वाढल्यास कोविड केअर सेंटर सुरू होणार
जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाल्यास बंद करण्यात आलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने बुधवारी बैठक घेऊन याचा आढावा घेतला. सध्या रुग्ण संख्या आटोक्यात असली तरी काही जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजना केल्या जात आहे.
.......
दुसऱ्या टप्प्यात १२८९ जणांना लसीकरण
कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. ज्यांना पहिली लस देण्यात आली त्यांना आता दुसऱ्या टप्प्यात लसीकरण केले जात आहे. या अतंर्गत आतापर्यंत १२८९ जणांना लसीकरण करण्यात आले आहे. यात सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
....
११ केंद्रावरून लसीकरण
कोरोना लसीकरण मोहिमेतंर्गत आतापर्यंत ११३०४ जणांना लसीकरण करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यातील एकूण ११ केंद्रावरून लसीकरण करण्यात येत आहे. यात आरोग्य, महसूल, पोलीस आणि शिक्षकांना सुध्दा लसीकरण केले जात आहे. लसीकरण मोहीम पूर्ण करण्यासाठी पुन्हा केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे.