गोंदिया : काम करून देण्यासाठी सर्रास पैशांची मागणी करून लाचखोरी करणाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा हातोडा चांगलाच बसताना दिसत आहे. हेच कारण आहे की, सन २०१८ पासून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातत्याने कारवाया करीत आला आहे. मात्र, धक्कादायक बाब अशी की, गोंदिया तालुक्यातच सर्वाधिक लाचखोर असल्याचे दिसत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालानुसार, सन २०१८ पासून आतापर्यंत गोंदिया तालुक्यातच सर्वाधिक ३७ कारवाया करण्यात आल्या असून यामध्ये ५१ लाचखोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पूर्वी आपल्या हातून कुणाचे काही काम झाल्यास किंवा मदत झाल्यास पुण्य घडले, असे समजले जात होते. मात्र, कालांतराने ती विचारधारा लोप पावत गेली. आज सर्वच बाबींत अर्थकारण येऊ लागले आहे. यामुळेच आजघडीला कुणाचे काही काम करून देण्यासाठी चहापाणी किंवा मिठाईच्या नावावर सर्रास पैशांची मागणी केली जाते. पैसे घेऊन काम करून देण्यालाच लाचखोरी म्हटले जाते. त्यानुसार, कोणतेही काम करावयाचे असल्यास थेट पैसे देऊन काम करणे ही आजची परंपरा झाली आहे. यामुळे मात्र अशा या लाचखोरांचे तोंड दिवसेंदिवस जास्तच फाटत चालले आहे. अशा या लाचखोरांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची असून ते अशा या प्रकरणांत कारवाया करतात.
असे असले तरीही एखादा तोंडी लागलेला पैशांचा चस्का कमी होत नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सातत्याने कारवाया सुरूच आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, जिल्ह्यात गोंदिया तालुक्यात सर्वाधिक लाचखोर असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालातून दिसून येते. हेच कारण आहे की, सन २०१८ पासून आतापर्यंतची आकडेवारी बघितल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तालुक्यात लाचखोरीच्या ३७ कारवाया केल्या असून यामध्ये ५१ लाचखोरांना दणका देत गुन्हा नोंद केला आहे.
-------------------------------------
आतापर्यंत ६९ कारवायांत ८८ लाचखोरांवर गुन्हा
सन २०१८ पासून जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा कारभार सुरू झाला आहे. तेव्हापासून आतापर्यंत विभागाने जिल्ह्यात ६९ कारवायांत ८८ लाचखोरांवर गुन्हा नोंद केला आहे. यात सर्वाधिक गोंदिया तालुक्यात ३७ कारवायांत ५१ लाचखोर असून सर्वात कमी देवरी तालुक्यात १ कारवाई असून १ लाचखोरावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, देवरीत सन २०१८, १९ व २० मध्ये एकही कारवाई नसून सन २०२१ मधील ही पहिलीच कारवाई आहे.
----------------------------------
५ महिन्यांत केल्या ६ कारवाया
सन २०२१ मध्ये आता मे महिना संपत आला आहे. म्हणजेच, ५ महिने झाले असून या ५ महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आतापर्यंत ६ कारवाया केल्या असून ८ लाचखोरांवर गुन्हे दाखल केले आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षापासून कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. कोरोनाने पैसा कामी येत नसून आपले संचितच कामी येत असल्याचे दाखवून दिले आहे. तरीही, लाचखोरांना फक्त पैसाच हवा असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालातून दिसून येते.
----------------------------
कारवायांचा तालुकानिहाय तक्ता (सन २०१८ ते आतापर्यंत)
तालुका गुन्हे आरोपी
गोंदिया ३७ ५१
गोरेगाव ६ ८
तिरोडा १० १२
आमगाव ४ ४
देवरी १ १
सडक-अर्जुनी ४ ४
अर्जुनी-मोरगाव ३ ४
सालेकसा ४ ४
एकूण ६९ ८८